हद्द झाली : यंत्रणा सुस्त, अडीच हजारांचे रेमडेसिव्हिर 25 हजाराला

हद्द झाली : यंत्रणा सुस्त, अडीच हजारांचे रेमडेसिव्हिर 25 हजाराला

कोल्हापूर : अतिगंभीर कोरोनाग्रस्तांवर रेमडेसिव्हिर हे इंजेक्‍शन (Remedivir Injection) उपयुक्त ठरत आहे; पण त्यांचा प्रचंड तुटवडा असताना कोल्हापुरात मात्र अडीच हजारांचे इंजेक्‍शन 25 ते 30 हजाराला काळ्या बाजारात (Black Market) विकले जात आहे. रुग्णांना वेळेवर आणि ज्या रुग्णालयात रुग्ण दाखल आहे, त्या ठिकाणी हे इंजेक्‍शन मिळावे म्हणून त्याचे केंद्रीकरण केले; पण त्यातूनही काळाबाजार होत आहे.

Remedivisvir injection black market case kolhapur covid 19 update martahi news

जिल्हा प्रशासनाने कंपन्यांकडे मागणी केल्यानंतर त्या तुलनेत पुरवठा होत नसताना काळ्या बाजारात मात्र हे इंजेक्‍शन उपलब्ध होते कसे?, असा सवाल उपस्थित होत आहे. कोरोनाचा(Covid19) जिल्ह्यातील कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अतिगंभीर रुग्णांची संख्याही जिल्ह्यात मोठी आहे. कोरानावर थेट असे औषध (Medicine)अजून सापडलेले नाही; पण अतिगंभीर रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर हे प्रभावी ठरत आहे. या इंजेक्‍शनसाठी धावाधाव करण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे.

नातेवाईकांची होणारी परवड लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिव्हिर उपलब्धतेसाठी स्वतंत्र कक्ष नेमला आहे. या कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह अन्न व औषध प्रशासन विभागाकडील अधिकारी, कर्मचारी आहेत. ज्या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण दाखल आहेत आणि त्यांना रेमडेसिव्हिरची गरज आहे, त्या रुग्णालयांनी मागणी प्रशासनाकडे करायची आणि प्रशासनाकडूनच त्याचा पुरवठा संबंधित रुग्णालयाच्या मागणीनुसार करायचा, असे नियोजन केले आहे; पण हे नियोजनही कागदावरच आहे.

जिल्ह्यात या इंजेक्‍शनचे स्टॉकिस्ट दहा आहेत, त्यांच्याकडून आगाऊ पैसे भरून इंजेक्‍शनची मागणी कंपन्यांकडे केलेली असते, कंपनीकडून पुरवठा होणारी इंजेक्‍शन कोणत्या रुग्णालयात किती द्यायची, हे प्रशासनाच्या नियोजनानुसार ठरवले जाते; पण कंपन्यांकडून आलेल्या इंजेक्‍शनची खरी माहितीच दिली जात नसल्याने हा काळाबाजार फोफावला आहे.

पंधरा दिवसांत दहा टक्केच पुरवठा

पंधरा दिवसांत प्रशासनाकडे तब्बल 42 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची मागणी नोंदवली आहे. त्याचा पाठपुरावा प्रशासनामार्फत स्टॉकिस्ट आणि कंपन्यांकडे केला; पण प्रत्यक्षात यापैकी 10 टक्केच म्हणजे 4 हजार ते 4200 एवढ्याच इंजेक्‍शनचा पुरवठा झाला आहे.

रुग्णालयाच्या पातळीवरच काळाबाजार

या इंजेक्‍शनच्या स्टॉकिस्टांकडे (विक्रेते) पुरवठा झाल्यानंतर त्याची माहिती प्रशासनाला दिली जाते. प्रशासनाकडून संबंधित विक्रेत्यांनाच रुग्णालयनिहाय किती पुरवठा करायचा, याची यादी दिली जाते, त्याप्रमाणे रुग्णालयात गेल्यानंतर संबंधित डॉक्‍टरांना त्याची माहिती होण्यापूर्वीच पॅरा मेडिकल स्टाफकडून याचा बाजार मांडला जातो. यावर उपाय म्हणजे एखाद्या रुग्णालयाला दहा इंजेक्‍शन दिली, तर ती त्या रुग्णालयातील कोणत्या रुग्णांना दिली, याची खात्री प्रशासनाने करण्याची गरज आहे; पण हे होत नसल्यानेच काही रुग्णालयांनीच हा बाजार मांडल्याचा संशय विक्रेत्यांचा आहे.

रुग्णालयाबाहेर व्यवहार

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन नातेवाईकांची निकड पाहूनच हा व्यवहार केला जातो. यात साखळी कार्यरत आहे. रुग्णालयात ही देवाणघेवाण न करता त्या परिसरातील एखाद्या ठिकाणावर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना बोलवायचे, त्याला इंजेक्‍शन द्यायचे आणि पैसे जमा करण्याच्या ठिकाणी दुसरेच सांगून तिथे ते द्यायला लावायचे, असा व्यवहार सुरू आहे.

Remedivisvir injection black market case kolhapur covid 19 update martahi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com