चंद्रकांतदादांच्या दौर्‍यात बिनकामाच्या कार्यकर्त्यांना प्रसाद वाटून लाड

चंद्रकांतदादांच्या दौर्‍यात बिनकामाच्या कार्यकर्त्यांना प्रसाद वाटून लाड

चिपळूण - आगामी निवडणुकांमध्ये कोकणात ताकद वाढविण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र बिनकामाच्या कार्यकर्त्यांना प्रसाद वाटून त्यांचे लाड पुरविले जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यातून पक्षात अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणावर आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चिपळूण दौर्‍यात ती दिसून आली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व असताना त्यांच्या दौर्‍याकडे चिपळुणातील भाजपचे कार्यकर्ते फिरकलेच नाहीत. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात पक्ष वाढविण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू झाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपला यश मिळाले नाही. मात्र चिपळूण शहराचा नगराध्यक्ष आणि तीन नगरसेवक निवडून आले. चिपळुणात पक्ष कमकुवत होता, तेव्हा येणार्‍या प्रत्येकाचे स्वागत झाले. मात्र पक्ष वाढू लागल्यानंतर गटा-तटाचे राजकारण सुरू झाले. सत्तेची फळे चाखण्यासाठी भाजपमध्ये दाखल झालेल्या स्वार्थी लोकांच्या हाती पक्षाची सूत्रे गेली आहेत. सत्ता नसताना कमळ जिवंत ठेवण्याचे काम करणार्‍या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाते अशी भावना व्यक्त होत आहे.

जुन्या कार्यकर्त्यांनी सुचविलेली कामेही केली जात नाहीत. नेत्यांची शिफारस पत्र घेऊन गेल्यानंतरही दाद दिली जात नाही. पक्षाचे कार्यक्रम राबवताना किंवा पक्षात एखाद्याला घ्यायचे असेल तर जुन्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले जात नाही.  

पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍यांना बळ देण्याऐवजी स्वार्थी लोकांचे बाळ हट्ट पुरविले जात आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास त्याचा मोठा फटका पक्षाला बसेल. 

- दिनेश पेढांरी, आरवली, ता. संगमेश्‍वर

पक्षात जुना-नवा वाद आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम मी करत आहे. जे नाराज असतील त्यांची नाराजी आम्ही दूर करू. 

- बाळ माने, जिल्हाध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com