...तर राजीनामे! सिंधुदुर्गातील सरपंच का झालेत आक्रमक?

resignation warning sindhudurg district sarpanch
resignation warning sindhudurg district sarpanch

कणकवली (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमांन्यासाठी 14 दिवसांचा कालावधी क्वारंटाईनसाठी असावा तसेच सरपंचांना त्यांच्या मागणीनुसार संरक्षण मिळावे; मात्र सात दिवसांचे क्वारंटाईन केल्यास सरपंच सनियंत्रण समितीचा राजीनामा देतील, असा इशारा जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस कणकवली तालुका सरपंच भाजप संघटनेचे तालुका अध्यक्ष पिसेकामते सरपंच सुहास राणे, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, करंजे सरपंच मंगेश तळगांवकर, आशिये सरपंच रश्‍मी बाणे आदी उपस्थित होते. 
राणे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन एकच नियम करावा. जेणेकरून सरपंचांना त्रास होणार नाही. तसेच जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक चाकरमाण्याची स्वॅबटेस्ट प्रवेशद्वारावरच घेऊन तो निगेटिव्ह असल्याची खात्री करण्यास कोणतीही हरकत राहणार नाही. 

चाकरमान्यांचा संस्थात्मक किंवा गृहविलगीकरणबाबत जो निर्णय झाला आहे. त्याला बहुतांशी लोकप्रतिनिधींनी विरोध करत 7 दिवस क्वारंटाईन करावे असे म्हटले आहे; मात्र याबाबत सरपंचांचा तीव्र विरोध आहे. आतापर्यत जे चाकरमानी गावात आले ते 14 दिवस क्वारंटाईन राहिले. त्यामुळे याही वेळेला गावात येणाऱ्या व्यक्तींबाबत 14 दिवसांपेक्षा कमी दिवसाचा निर्णय घेतल्यास कोरोना फैलावू शकतो. 

राज्य शासनाने किंवा केंद्र शासने परप्रांतीय लोकांसाठी मोफत प्रवासाची सेवा केली. तशीच सेवा कोकणातील चाकरमान्यांसाठी करावी अशी आमची मागणी आहे. पालकमंत्र्यांनी सुद्धा सरपंचाचा विमा उतरविण्याची घोषणा केली होती; परंतु ती झाली नाही. अनेक अडचणी आहेत. प्रत्येक पंचक्रोशीत बाजारपेठ आहे. तिथे एकत्रित सगळा व्यापार होतो; मात्र गणेशोत्सवाच्या हंगामात मोकळ्या जागेमध्ये स्वतंत्र भाजीपाला, फळांचा व्यापार करावा, अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे. सरपंचांना शासनाकडून किंवा पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. कणकवली तालुक्‍यातील शेर्पे सरपंचांबाबत जी घटना घडली. त्याबाबत काहीच कारवाई झाली नसल्याची खंत व्यक्त झाली. 

कोरोना टेस्ट महत्त्वाची 
तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा, आरोग्य यंत्रणेचे चांगले सहकार्य मिळाले. गाव समितीनेही योग्य नियोजन केले; मात्र गणेशोत्सवास येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता आणि गावातील सुविधा लक्षात घेता या गोष्टी अशक्‍य आहेत. त्यामुळे शासनाने सरसकटपणे पास देताना विचार करण्याची गरज आहे. पास दिले नाही तरी चालतील; परंतु येणाऱ्या व्यक्ती कोरोना टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे. गणेशोत्सव कालावधीत काही नियम करावेत, अशी मागणीही करण्यात आली. 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com