esakal | गणेशोत्सवात कुठल्या जिल्ह्यात आले भजन, आरत्या, फुगड्यांवर निर्बंध... वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

o

यंदा कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

गणेशोत्सवात कुठल्या जिल्ह्यात आले भजन, आरत्या, फुगड्यांवर निर्बंध... वाचा 

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) :  कोरोनाचे संकट लक्षात घेता गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी भजन, आरत्या, फुगड्या घरगुती स्वरूपात कराव्यात. मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज येथे केले. यंदाचा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. 

गणेशोत्सवाला आणखी दहा दिवसांनी म्हणजे (ता. 22) ला सुरुवात होत आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो; परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. गणेशोत्सवासाठी 12 ऑगस्टपर्यंत एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांना 10 दिवसांचेच होम क्वारंटाईन आहे. त्यांना जिल्ह्यात येण्यासाठी ई-पासची गरज नाही; मात्र खासगी गाड्यांनी येणाऱ्यांना ई-पास काढावाच लागणार आहे. 12 ऑगस्टनंतर येणाऱ्यांना 48 तास अगोदर कोविड 19 टेस्ट करून यावे लागेल. अहवाल निगेटिव्ह असला पाहिजे. त्यांना तीन दिवस होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. 

घरगुती गणपती शक्‍यतो कमीत-कमी दिवसाचा करावा. गणपती आगमन किंवा विसर्जनाच्या वेळी मिरवणुका काढू नयेत. कमीत-कमी लोकांच्या उपस्थितीत विसर्जन करावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी जाणे टाळावे. गावातील वाडी किंवा चाळीमधील एकत्रित विसर्जन करू नये. गणपतीची पूजा शक्‍यतो पुरोहितांकडून न करता स्वतःच करावी. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. आरत्या, भजने, फुगड्या, गौरी पूजन, वसा हे कार्यक्रम घरगुतीच करावेत. तेथेही गर्दी नको. घरोघरी भेटी टाळा. सार्वजनिक मंडळांना तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागेल. सार्वजनिक गणेशोत्सव भपकेबाज न करता छोटा मंडप घालून सोशल डिस्टन्सचा, स्वच्छतेचे व इतर सर्व नियम पाळत साजरा करावा, अशा सूचना आहेत. 

अहवालांचीही खातरजमा 
एसटी बस किंवा अन्य खासगी वाहनांद्वारे 12 ऑगस्टनंतर जिल्ह्यात येतील त्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या किमान 48 तासांपूर्वीची आरटी- पीसीआर चाचणीचा तपासणी अहवाल निगेटिव्ह असणे अनिवार्य आहे. अहवाल निगेटिव्ह आलेल्यांनाच थेट घरात प्रवेश आहे. त्यांना पुढील तीन होम क्वारंटाईन व्हावे लागले. स्थानिक आरोग्य यंत्रणेने त्यांना लक्षणे नसल्याची शहानिशा करावी. नागरिकांची जिल्ह्याच्या सीमेवरच आरोग्य तपासणी होणार आहे. पल्स ऑक्‍सिमिटर, थर्मर स्केनर, रॅपीड एंटीजेन टेस्ट केली जाणार आहे. आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्ती, दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींची रॅपीड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. 

अधिकाऱ्यांकडे नियोजन 
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तालुका पातळीवरील संबंधित गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, मुख्याधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात. बैठकीस गाव नियंत्रण समिती, वॉर्ड नियंत्रण समितीच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करावे, गणेशोत्सव कालावधीत पार पाडावयाच्या जबाबदारी, तसेच गावातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याबाबतचे नियोजन करावे व संबंधितास अवगत करावे, असे आदेश आहेत. 

कोविड केअरच्या क्षमतेत वाढ 
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवावी. त्यासाठी सर्व तहसीलदारांनी सहकार्य करावे. त्यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

पूजेसाठी तंत्रज्ञान वापरा 
घरगुती गणपतीची पूजा शक्‍यतो स्वतःच करावी. पुरोहित (भटजी) टाळावा. तशी पूजा करायची असल्यास त्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा. गणेशोत्सव कालावधीत भजन, आरत्या, फुगड्या, कीर्तन, गौरी आगमन, ववसा आदी कार्यक्रम घरगुती स्वरुपात कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करावेत. घरोघरी फिरुन भेट देणे टाळावे. 


रुग्ण बाधित मिळाल्यास नियम पाळावे लागणार 
कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे घोषित केलेल्या किंवा नव्याने घोषित केल्या जाणाऱ्या प्रतिबंधित (कंटेन्मेंट झोन) क्षेत्राच्या बाबतीत संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रतिबंध लागू राहतील. कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हा गणेशोत्सव साजरा करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. 

घरगुती मूर्तीची उंची दोन फूटच 
श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट, तर घरगुती दोन फुटांच्या मर्यादेत असावी, अशी अट या नियमावलीत आहे; मात्र दोनच दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी गणेशमूर्ती उंचीसाठी अट नसल्याचे म्हटले होते. जिल्ह्यात बहुतांश गणेशमूर्ती दोन फुटांपेक्षा जास्त बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेश भक्त अडचणीत आले आहेत. 

आगमन-विसर्जनसाठी अटी 

 • "श्रीं'च्या आगमन व विसर्जन मिरवणुका नकोत. 
 • विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. 
 • लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने तेथे टाळावे. 
 • संपूर्ण चाळीतील, वाडीतील, गावातील, इमारतीतील सर्व घरगुती मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये. 
 • शक्‍यतो घराजवळच विसर्जन करावे. 
 • विसर्जनावेळी कोविड 19 बाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. 
 • याबाबत गाव समिती, प्रभाग समिती यांनी दक्षता घ्यावी. 


सार्वजनिक मंडळांसाठी नियम 

 • तहसीलदार, पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्‍यक 
 • मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावे 
 • सजावटीत भपकेबाज नको 
 • मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था आवश्‍यक 
 • मंडपामध्ये निर्जंतुकीकरणासह थर्मल स्क्रीनिंग गरजेचे 
 • श्री गणेश दर्शनाची ऑनलाईन व्यवस्था करावी 
 • मंडळाला भेटी दिलेल्या व्यक्तींची नोंद आवश्‍यक 
 • मंडळाबाहेर हार, नारळ, मिठाई दुकानांना बंदी  

 
संपादन ः विजय वेदपाठक

loading image
go to top