रेवस गाळात...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

स्वातंत्र्यपूर्व काळापासून वापरात असलेल्या रेवस बंदरात आजच्या डिजिटल युगातही मूलभूत सुविधांची वानवा आहे...

अलिबाग - १०३ वर्षांहून जुन्या असलेल्या रेवस बंदराकडे मेरिटाईम बोर्डाचे दुर्लक्ष होत आहे. बंदराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील लाकडी कार्यालये मोडकळीस आली आहेत. प्रवासी बोट व तर चालकांना गाळाची समस्या भेडसावत आहे. आवश्‍यक सोई-सुविधांअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. मेरिटाईम बोर्डाने या बंदराची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. 

अलिबाग शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर रेवस बंदर आहे. या बंदरातून स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबई व उरणमध्ये जलमार्गाने प्रवासी वाहतूक सुरू आहे. दररोज हजारो प्रवासी या जलमार्गावरून प्रवास करतात. हे बंदर शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याची साक्ष देणारी कोनशिला आजही पाहायला मिळते. काळाच्या ओघात कोनशिलेवरील इंग्रजीतील लिखाण पुसट झाले असले, तरी उभारणीची सनावळी १९१३ ही पाहायला मिळते.

या बंदरावर पूर्वीपासूनच लाकडी कार्यालये उभारण्यात आली आहेत. सध्या या कार्यालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यांची पडझड सुरू आहे. कधीकाळी येथे प्रवाशांचे निवासस्थान, मेरिटाईम बोर्डाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कार्यालय, पोलिस चौकी होती. आता दुरवस्थेमुळे निवासस्थान व कार्यालये बंद झाली आहेत. मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. 

बंदराकडे जाणारा रस्ता; तसेच पुलाची दुरवस्था झाली आहे. रेवस धक्‍क्‍यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. बंदरावर आजूबाजूच्या गावांमधून पाणी आणावे लागते. स्वच्छतागृहासाठीचे  पाणी उघड्या टाकीत साठवले जाते. सोडियम व्हेपरच्या दिव्यांमुळे हा धक्का प्रकाशमय झाला असला, तरी इतर मूलभूत सुविधांपासून वंचितच राहिला आहे. मोठ्या उधाणानंतर येणाऱ्या ओहोटीच्या दिवसात धक्‍क्‍याला मोठी बोट किंवा छोटी तरही लागत नाही. गाळामुळे प्रवाशांचे फार हाल होतात. हा गाळ काढला जात नाही. परिणामी भरतीची प्रतीक्षा करून वाहतूक सेवा बंद करावी लागते. त्यामुळे हा धक्का आणखी शंभर मीटर पुढे न्यावा, अशी मागणी होत आहे. बंदराची तातडीने डागडुजी करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

रेवस बंदरावर आवश्‍यक सोई-सुविधांचा अभाव आहे. जवळील मांडवा बंदराची डागडुजी करण्यात आली; मात्र या बंदराकडे मेरिटाईम बोर्डाचे दुर्लक्ष होत आहे. पुलाची दुरवस्था झाली आहे. पाण्याची सोय नाही. लाकडी कार्यालये अखेरच्या घटका मोजत आहेत. गाळामुळे बोट धक्‍क्‍याला लागत नाही. त्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतो. 
- शिल्पा पाटील, प्रवासी. 

रेवस बंदराची तातडीने डागडुजी करणे गरजेचे आहे. गाळामुळे बोट धक्‍क्‍याला लागण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे बंदराची लांबी १०० मीटरने वाढवली गेली पाहिजे. आवश्‍यक त्या सोई-सुविधाही बंदरावर उपलब्ध करून देण्यात याव्यात. 
- प्रतीक मोकल, प्रवासी.

Web Title: Revas port