महाराष्ट्र पडला मागे ; ४ राज्यांनी मारली बाजी

मकरंद पटवर्धन
Wednesday, 11 November 2020

गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांचा चेहरामोहरा २,१५० कि. मी. लांबीच्या सागरी महामार्गामुळे बदलणार आहे

रत्नागिरी : गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांचा चेहरामोहरा २,१५० कि. मी. लांबीच्या सागरी महामार्गामुळे बदलणार आहे; परंतु महाराष्ट्रातील हद्द सोडल्यास उर्वरित सर्व राज्यांतील महामार्ग तयार आहेत. रेवस-रेड्डी हा मार्ग लवकर होणे गरजेचे आहे. त्यातूनच कोकणचे पर्यटन वाढणार आहे, असे प्रतिपादन कोकणच्या प्रश्‍नांचे अभ्यासक ॲड. विलास पाटणे यांनी केले.

कोरोना महामारी, लॉकडाउननंतर आता पर्यटन व्यवसाय हळूहळू सुरू होत आहे. याबाबत त्यांनी सागरी महामार्गाची गरज मांडली. गुजरातच्या लखपत गावापासून सुरू होऊन केरळच्या कोचिनपर्यंत हा सागरी महामार्ग जाणार आहे. ॲड. पाटणे म्हणाले की, मुखाजवळ खाडीची रुंदी अधिक असल्याने पूल बांधण्याकरिता खर्च जादा येत असल्याने ७/८ कि. मी. दूरवर तुलनेने खर्च कमी येतो.

हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझे संबंध घनिष्ठ आहेतच ; मंत्रिपदाबाबत मात्र येणारा काळच उत्तर देईल -

किनारपट्टीलगत गावातून दाट लोकवस्ती असल्याने रस्ता काढणे कठीण जाते. दिघी, आगरदांडा, बाणकोट, जयगड व दाभोळ हे पूल राष्ट्रीय ग्रामीण विकास बॅंकेकडे (नाबार्ड) प्रस्तावित आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज्यातील युती 
सरकारमध्ये बांधकाम मंत्री असताना त्यांनी ७-८ पूल मार्गी लावले होते.

पर्यटनाला गती

कोकणातील किनारपट्टीवरील पर्यटन विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात उतरतील. समुद्रकिनाऱ्याचे जगभरच्या पर्यटकांच्या दृष्टीने मार्केटिंग करता येईल. आंबा उत्पादन व मच्छीमारी व्यवसायाला अधिक गती मिळेल. बंदर विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याने जलद व सुलभ वाहतुकीस चांगला पर्याय उपलब्ध होईल.

मुंबई प्रवास दीड तासाने कमी 

ठाण्यातील झाई गावापासून सुरू होऊन हा महामार्ग रेवस, रेवदंडा, दाभोळ, जयगड, मालवणमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सातार्डे गावातून गोव्यात शिरेल. पणजीपासून थेट कोचिनपर्यंत ७३१ कि. मी. लांबीचा सागरी महामार्ग सलग किनारपट्टीनेच जातो. कोकणपट्टीतून जाणा-या रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे मुंबईचे अंतर १०५ कि. मी. ने कमी होऊन प्रवासाची वेळ दीड तासाने कमी होईल.

हेही वाचा - आता शेतकऱ्यांची वसुली थांबवणार -

दृष्टिक्षेपात 

- समुद्राचे विलोभनीय दर्शन 
- २१५० कि.मी. लांबीचा मार्ग
- अर्थसाह्याअभावी पूल रखडले
- खासगीकरणातून पूल बांधावे
- वेळेची होणारी बचत पथ्यावर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: revas reddi sea road working pending said vilas patane time period also decreases from konkan to mumbai