कातळशिल्पांना मिळाले महसुली संरक्षण 

मकरंद पटवर्धन
रविवार, 1 जानेवारी 2017

रत्नागिरी : लांजा, राजापूर व रत्नागिरी तालुक्‍यात सापडलेल्या कातळशिल्पांना वा भविष्यात मिळू शकणाऱ्या अशा शिल्पांना महसुली संरक्षण मिळाले आहे. महसूल खात्याने काढलेल्या या आदेशानंतर राज्य सरकारने अमूल्य असा हा अर्वाचिन ठेवा जपण्यासाठी पाऊले उचलण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांयोग्य अशी ही शिल्पे रत्नागिरीला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर नेऊन ठेऊ शकतात. 

रत्नागिरी : लांजा, राजापूर व रत्नागिरी तालुक्‍यात सापडलेल्या कातळशिल्पांना वा भविष्यात मिळू शकणाऱ्या अशा शिल्पांना महसुली संरक्षण मिळाले आहे. महसूल खात्याने काढलेल्या या आदेशानंतर राज्य सरकारने अमूल्य असा हा अर्वाचिन ठेवा जपण्यासाठी पाऊले उचलण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांयोग्य अशी ही शिल्पे रत्नागिरीला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर नेऊन ठेऊ शकतात. 

जिल्ह्यात उत्खननाला परवानगी देताना महसूल खात्याने एकूण 32 अटी व शर्थी लागू केल्या आहेत. जिल्ह्यात कातळभागात प्रामुख्याने चिरेखाणींकरिता उत्खनन केले जाते. याच कातळ पट्ट्यावर प्रामुख्याने ही शिल्पे आढळून आली आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्याची मागणी होती. महसूल खात्याने लागू केलेल्या अटीतील 24 वी अट महत्त्वाची आहे. त्यात म्हटले आहे, की परवाना मंजूर केलेल्या क्षेत्रात कातळशिल्प आढळल्यास त्या ठिकाणचे उत्खनन तत्काळ थांबवायचे आहे. कातळशिल्पाच्या चार सीमांना आवश्‍यक ती जागा मोकळी सोडून उर्वरित भागात उत्खननाला परवानगी आहे. तीन तालुक्‍यांत 38 गावांत कातळशिल्पे असलेली 57 ठिकाणे आहेत. तेथे सुमारे 500 कातळचित्रे आढळून आली आहेत. यासह कोळंबे, जुवाठी, पन्हाळे तसेच सोलगाव व देवाचे गोठणे यादरम्यान आणखी काही कातळशिल्पे आढळली आहेत. ज्ञात शिल्पांना संरक्षण देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. महसूल खात्याचा याला प्रतिसादही चांगला आहे. निवळी गावडेवाडी येथे कातळचित्र असल्याने प्रांतांनी प्रथम उत्खननाला परवानगीच दिली नाही. त्यानंतर यातील जाणकारांना घेऊन त्यांनी स्वत: कातळशिल्पांना भेट दिली व चित्रापासून योग्य ते अंतर सोडून परवानगी दिली. तसेच कुंपणही घालण्यास आदेश केला आहे. 

महसूलने कातळशिल्पांना संरक्षण देण्याचे चांगले पाऊल उचलले आहे. मात्र त्याची योग्य ती कार्यवाही संबंधितांकडून झाली नाही तर कारवाईही अपेक्षित आहे, असे मत ही चित्रे शोधण्यात आघाडीवर असलेले धनंजय मराठे यांनी व्यक्‍त केली. 

सात-बाराला नोंद करण्याचा प्रस्ताव 
राजापुरात मिळालेल्या कातळशिल्पांची नोंद सात-बाराला व्हावी, यासाठी राजापूर प्रांत सुशांत खांडेकर यांनी पुढाकार घेतला होता. तसा प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. 

महसूलने दिलेले संरक्षण महत्त्वाचे असून या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. काही ठिकाणी कातळशिल्पे असूनही ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तर त्यावर कारवाईही करण्याची गरज आहे. कातळशिल्पांची नोंद सातबारावर झाली तर परवानगी देतानाच ते लक्षात येईल. 
- सुधीर रिसबूड, कातळशिल्प अभ्यासक

Web Title: Revenue department orders for security of historical sites in Ratnagiri