महसूल कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

महसूल कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी - प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (ता. 11) निदर्शन केली जाणार असून टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केले जाणार आहे. संघटनेने 5 सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. 

वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये शासनाने तत्वत: मान्य केलेल्या मागण्यांना सहा वर्षांचा कालावधी होवूनही दुर्लक्षित आहेत. शासनाकडून आजपर्यंत कोणताही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसून शासन फक्त आश्वासन देवून महसूल कर्मचाऱ्यांची फसवणूक करीत आहे. तसेच महसूल कर्मचा-यांचा शासनावरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असून शासनाविरुध्द तीव्र आंदोलन करण्याची मानसिकता तयार झाली आहे.

हे आंदोलन होऊ नये, यासाठी शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी दिलेल्या आश्वासनानूसार तातडीने शासन निर्णय निर्गमित करावेत, अन्यथा यापूर्वी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा करण्यात येईल, असा ठराव राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पुणे येथील बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला आहे.

शासन निर्णय त्वरित न काढल्यास संघटनेकडून आंदोलनाचा इशारा दिला आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या शासनाने मान्य केलेल्या तसेच प्रलंबित मागण्यांचा शासन निर्णय त्वरित जारी करावा. अन्यथा संघटना आंदोलन करणार आहे असे निवदेनात नमूद केले आहे. 

आंदोलनाचा कार्यक्रम असा... 
11 जुलैला दुपारी जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाचे दारावर निदर्शने करणे व प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात वस्तूस्थिती नमुद करणारे फलक (बॅनर) लावण्यात येणार आहेत. 23 जुलैला दुपारी जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाचे दारावर घंटानाद करुन निदर्शने केली जातील. 30 जुलैला काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज , 9 ऑगस्टला सायंकाळी 1 तास शासनाचा निषेध, 16 ऑगस्टला संगणक किंवा लेखणी बंद आंदोलन, 21 ऑगस्टाला सामुदायिक रजा टाकून धरणे आंदोलन, 28 ऑगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप तर 5 सप्टेंबरला बेमुदत संपाचे हत्यार उगारण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com