भातही वातावरण बदलांच्या रडारवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

सावंतवाडी : पावसाळ्याआधी जाणवलेली तीव्र पाणीटंचाई व उशिरा सक्रीय झालेला मॉन्सून, यामुळे यंदा भातपीक उत्पादनावर परिणामाची शक्‍यता कृषी अभ्यासक वर्तवत आहेत. यामुळे आंबा, काजूबरोबरच जिल्ह्यातील मुख्य खरीप पीक असलेले भातही बदलत्या वातावरणाच्या दुष्परिणामांखाली येण्याची भीती आहे. 

सावंतवाडी : पावसाळ्याआधी जाणवलेली तीव्र पाणीटंचाई व उशिरा सक्रीय झालेला मॉन्सून, यामुळे यंदा भातपीक उत्पादनावर परिणामाची शक्‍यता कृषी अभ्यासक वर्तवत आहेत. यामुळे आंबा, काजूबरोबरच जिल्ह्यातील मुख्य खरीप पीक असलेले भातही बदलत्या वातावरणाच्या दुष्परिणामांखाली येण्याची भीती आहे. 

गतवर्षी पाऊस उशिरा दाखल झाला होता. या वर्षीही मॉन्सूनला उशीर झाल्याने भातपीक लागवड उशिरानेच सुरू झाली. या वेळी पाऊस जास्त पडण्याचेही संकेत आहेत. या वर्षी तालुक्‍यात भातपिकाखाली 7 हजार 200 हेक्‍टर क्षेत्र उद्दिष्ट आहे. जिल्ह्याला ते 68 हजार हेक्‍टर इतके आहे. या वर्षी पाणीटंचाईचे तीव्र दुष्परिणाम ठिकठिकाणी दिसून आले. त्यामुळे योग्य वेळेत शेतीच्या पूर्वमशागत कामांना हात घालता आला नाही. कृषी अभ्यासक आणि काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वातावरणाचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच तीव्र पाणीटंचाई आणि मॉन्सून उशिरा दाखल झाला. हे दोन वातावरणीय बदल भातपिकासाठी प्रतिकूल ठरण्याची भीती आहे. गतवर्षीच्या तुलनेत मॉन्सून उशिरा दाखल झाल्यामुळे मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना उशिरानेच हात घातला. ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक सोय झाली, अशांनी योग्य वेळेत नांगरणी व पेरणी केली. भातपीक लावणीची प्रक्रिया उशिराने झाल्याने पिकाचा दाणा तयार होण्यासाठीही विलंबच होणार आहे, असे मत काही कृषी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. त्याचा भातपीक उत्पादनावर परिणाम येणाऱ्या दिवसांत पाहायला मिळणार आहे. काही कृषी अधिकाऱ्यांच्या मते उशिरा मॉन्सूनची प्रक्रिया लक्षात घेता मोड काढून पेरणी केली आहे. यासाठी हळवी बियाणे वापरण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांनी मध्यम हळवी बियाण्यांची पेरणी केली आहे. आतापर्यंतच भातपीक पेरणी पूर्ण झाली असून, एसआरआय अर्थात श्री पद्धतीने लावणीला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे. तरीही सगुणरहित पद्धत (एसआरटी) आणि चारसूत्री पद्धतीतही उत्पन्न चांगले मिळणार आहे. श्री पद्धतीला पुढील वर्षी जास्त उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे. मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने या वेळी जूनऐवजी जुलैत लावणी प्रक्रिया बऱ्याच भागांत सुरू होणार आहे. सुरवातीला भातपिकाला पाऊस अनुकूल पडत असला, तरी एकाच दिवशी भातपिकास जास्त पाऊस कोसळला, तर तो पिकासाठी धोकादायक ठरेल. उशिरा मॉन्सून दाखल होणे आणि प्रमाणापेक्षा एकाच दिवशी जास्त पाऊस पडणे, याचाही फटका बसण्याची भीती कृषी अभ्यासक व्यक्त करत आहेत.
 

यंदा उशिराने लावणी सुरू झाली आहे. तरवा व पाण्याची सुविधा नसल्याने ही स्थिती ओढवली. काही उशिराने तरवा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कमी कालावधीची हळवी व मध्यम बियाणी पेरणीसाठी वापरली आहेत. 

- व्ही. एन. ठाकूर, कृषी अधिकारी, पंचायत समिती, सावंतवाडी

Web Title: rice crop climate changes on the radar