रंगल्या चर्चा; लागल्या पैजा...

तुषार सावंत - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

कणकवली - मिनी विधान सभेच्या नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य इलेक्‍ट्रॉनिक मतदान मशीनमध्ये निश्‍चित झाले आहे. आघाडीची बिघाडी आणि दुभंगलेल्या युतीमुळे मतांची विभागणी निश्‍चितपणे झाली आहे. यामुळे आता चर्चा रंगू लागल्या असून कार्यकर्त्यामध्ये पैजाही लागल्या आहेत. प्रतीक्षा आहे ती केवळ निकालाची. 

कणकवली - मिनी विधान सभेच्या नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य इलेक्‍ट्रॉनिक मतदान मशीनमध्ये निश्‍चित झाले आहे. आघाडीची बिघाडी आणि दुभंगलेल्या युतीमुळे मतांची विभागणी निश्‍चितपणे झाली आहे. यामुळे आता चर्चा रंगू लागल्या असून कार्यकर्त्यामध्ये पैजाही लागल्या आहेत. प्रतीक्षा आहे ती केवळ निकालाची. 

सिंधुदुर्गातील दीडशे जागा या बहुरंगी लढतीने प्रचारात रंगत आणणाऱ्या ठरल्या आहेत. जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान झाले. जनजागृतीनंतरही हा आकडा तसा समाधानकारक नाही. प्रशासनातील त्रुटी प्रामुख्याने मतदार यादीत असल्याने उमेदवारांना याचा फटका बसणार आहे. परंतु उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते याचा विचार न करता आपल्या मतांची गोळाबेरीज झालेल्या मतदानावरून घालू लागले आहेत. याचे कारण मतदानाच्या निवडणूक प्रक्रियेतील अधिकृत खर्च हा सहा आणि चार लाखांत असला तरी प्रत्यक्षात मात्र दहा, पंधरा, वीस नव्हे तब्बल तीस लाखांपर्यंतही एका गटात उमेदवारांनी खर्च केले अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. शेवटच्या टप्प्यात आपल्या हातातून विजय निसटतो म्हणून काहींनी उधारीवर पैसे घेऊन हा झुगार खेळला, असेही सांगितले जात आहे. काही उमेदवारांच्या दृष्टीने हा जुगार तर काहींच्या दृष्टीने ही लॉटरी ठरणार आहे. 

पक्षाकडे उमेदवारी मागताना लागलेल्या स्पर्धेतून आपला नंबर लागल्यामुळे राजकीय भवितव्य घडविण्याची ही एक नामी संधी हातची जाईल म्हणून पैशाचा खेळ जुगार म्हणून खेळावा लागला आहे. राजकीय पक्षांनी उमेदवाराच्या राजकीय प्रभुत्वावर विश्‍वास ठेवून उमेदवारी दिल्याने नेत्यांचा विश्‍वास संपादन करत असताना मत मिळालेच पाहिजे यासाठी खरी कसरत लागली होती. आता मतदान झाले त्यामुळे मतांची गणिते मांडली जात आहेत. कार्यकर्ते आपापसात पैजा लावून किती मताधिक्‍य मिळेल हे छातीठोकपणे सांगू लागले आहेत. निकाल उद्या दुपारी बारापर्यंत स्पष्ट होईल, असे मानले जात असले तरी इलेक्‍ट्रॉनिक मतदान मशीन यंत्रणेला कितपत साथ देतात यावर घटनाक्रम आणि निकालाची आकडेवारी जाहीर होत राहणार आहे. मात्र जसजशी निकालाची वेळ जवळ येत आहे तसतशी उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता, हुरहुर, धडधड वाढू लागली आहे. 

ढोल-ताशे, फटाक्‍यांची तयारी 
विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी ढोल, ताशे आणि फटाके यांचे बुकिंग केले आहे. उमेदवारी अर्ज भरताना काहींनी आपल्या विजयाची चुणूक दाखविली होती. निवडणुकीला विश्‍वासाने लढत देणारे उद्याच्या तयारीला लागेले आहेत. परंतु लाखो रुपये ओतूनही खात्री नसलेल्यांची धडधड मात्र वाढू लागली आहे.

Web Title: rise to politics discussion