सावधान ! रत्नागिरी जिल्ह्यात वाढतेय हवेचे प्रदुषण; काय आहेत कारणे ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदुषणाची पातळी वाढल्याचे हरित लवादाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याची तीव्रता चिपळूण परिसरात वाढली आहे.

चिपळूण - परिसरात हवेतील धुलिकणांत वाढ झाली असून, चौपदरीकरणाच्या कामाने त्यात भर पडली. हवा प्रदूषणाने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला. प्रदूषणाला आळा घालण्याचे मोठे आव्हान आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदुषणाची पातळी वाढल्याचे हरित लवादाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याची तीव्रता चिपळूण परिसरात वाढली आहे. लोटे एमआयडीसीतील विशिष्ट कारखाने हवेतील प्रदुषणात वाढ करत असतात. त्यात आता मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचीही भर पडली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. या कामासाठी महामार्गालगतची हजारो 
झाडे तोडली आहेत. महामार्गावर दिवसाला शेकडो वाहने धावतात. रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. रस्त्यावरील धूळ हवेत उडते. येथे डोंगर कटाईचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे या भागात धुळीचे प्रमाण जास्त आहे त्याचा परिणाम हवेच्या प्रदुषणावर होत आहे. 

शहरात वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ

मागील दोन दशकात चिपळूण शहर व लोटे परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे. त्यामुळे उद्योगधंदे वाढले आहेत. लोटे परिसरात केमिकल उद्योगाचे जाळे पसरल्याने त्याचा फायदा चिपळूण व खेड परिसराला अधिक झाला.स्थानिकांना रोजगार मिळाला. त्यामुळे नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढल्याने रहिवाशांचे जीवनमानसुद्धा उंचावले. त्यामुळे इतर सुविधांसह वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा परिणाम म्हणून शहरात वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषण वाढले आहे.

वातावरणातील बदलही कारणीभूत
वातावरणातील बदलाचासुद्धा प्रदुषणावर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी थंड आणि दुपारी उष्णता यामुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी आदी आजार बळावल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. विशेषकरून लहान मुले, वयोवृद्धांना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. याशिवाय घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे, जळजळ आदी समस्याही निर्माण झाल्या आहेत. 

लोटेतून जाताना जीव गुदमरतो

औद्योगिक कारखान्यांमधून निघणारे वायू नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. मुंबई - गोवा महामार्गावरून प्रवाशांना श्‍वासही घेता येत नाही. आम्ही ‘एमपीसीबी’च्या अधिकाऱ्यांसमोर वारंवार प्रदूषणाची व्यथा मांडली. मात्र, कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. लोटे परिसरातून जाताना जीव गुदमरतो, अशी स्थिती आहे. कारखान्यांचे प्रदूषण कमी करणे आणि तोडलेली झाडे पुन्हा लावणे गरजेचे आहे. 
- रामशेठ रेडीज, पर्यावरणप्रेमी, चिपळूण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Risk Of Air Pollution In Chiplun