हेवाळेत प्रबळ इच्छाशक्‍तीमुळे रस्ता झाला दुरूस्त; एसटीही सुरू

हेवाळेत प्रबळ इच्छाशक्‍तीमुळे रस्ता झाला दुरूस्त; एसटीही सुरू

दोडामार्ग - गावाचा विकास करण्यासाठी, वाड्या वस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एखाद्याकडे पदच हवे असे नाही. त्यासाठी लागते प्रबळ इच्छाशक्ती आणि "साथी हाथ बढाना' म्हटल्यावर चटकन धावून येणाऱ्या सहकाऱ्यांची फौज. स्वतःकडे कुठलंही पद नसताना हेवाळे गावांतील काही ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानाने तीन दिवस राबून रस्ता तयार केला आणि नादुरुस्त रस्त्यामुळे बंद झालेली एसटी पुन्हा सुरु झाली.

मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे मुळस ते हेवाळे रस्ता खराब झाला. प्रवेशद्वार असलेल्या पुलाचा पुर्वी दुरुस्त केलेला जोडरस्ता पुन्हा वाहून गेला. ठिकठिकाणी खड्डे पडले. गणेशकोंड भागातील रस्त्याची दुरवस्था झाली. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी सार्वजनिक बांधकामकडे करण्यात आली. त्यांनी दुर्लक्ष केले. रस्ता सुस्थितीत नसल्याने एसटी चालकांनी गाड्या नेण्यास असमर्थता दर्शवली. शेवटी गावातील काही युवकांनी श्रमदान करुन रस्ता वाहतुकीस योग्य बनवण्याची तयारी दाखवली आणि प्रत्यक्षात कामही सुरु झाले. माहिती अधिकार कार्यकर्ते उदय जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांना नारायण कदम, चंद्रकांत कदम, रामदास कदम, विनायक गवस, विलास देसाई यांनी साथ दिली. हेवाळे मुळस पुलाच्या जोडरस्त्याची नीट डागडुजी करण्यात आली. पुलाच्या पलिकडे हेवाळे गावाच्या दिशेने असलेल्या रस्त्यातील खड्डे बुजविण्यात आले. रस्त्यालगतची धोकादायक झाडी मारण्यात आली.

गणेश कोंड येथील रस्ता दुरुस्तीसाठी त्यांना स्थानिक ठेकेदार संदीप कोरगावकर आणि सहकाऱ्यांनी मदत केली. त्यांनी केलेल्या कामाने एक गोष्ट मात्र दाखवून दिली की, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com