उसर गावाचा रस्ता झाला सुकर....

अमित गवळे 
सोमवार, 9 एप्रिल 2018

सुधागड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील रस्त्याकरीता आदिवासी विकास बजेटद्वारा तब्बल 1 कोटी 17 लाख रुपयाचा भरिव निधी मंजूर झाला आहे.

पाली (जि. रायगड) - गेली अनेक वर्षे सुधागड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या उसर गाव व भोवतालच्या आदिवासी वाडयापाड्यांपर्यंत जाण्याकरीता रस्ता नव्हता. अखेर शेकाप आमदार धैर्यशिल पाटील यांच्या प्रयत्नाने व जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांच्या पाठपुराव्याने भावशेत ठाकूरवाडी पासून उसर गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामास सुरवात झाली आहे.
 
या रस्त्याकरीता आदिवासी विकास बजेटद्वारा तब्बल 1 कोटी 17 लाख रुपयाचा भरिव निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याची पाहणी रविवारी (ता. 8) आमदार धैर्यशिल पाटील यांनी रा. जि. प सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसह शे. का. प. पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्तांच्या समवेत केली. यावेळी रस्ता दर्जेदार, मजबूत व टिकावू होण्याच्या दृष्टीने धैर्यशिल पाटील यांनी महत्वपुर्ण सुचना दिल्या. उसर गावासह येथे वाघ्रणवाडी, गडदोणे ठाकूरवाडी, रेलाची ठाकूरवाडी, उसर धनगरवाडा, खडकीचीवाडी, डायाचावाडा आदी गावे असून या ठिकाणी साधारणतः 1200 च्या आसपास लोकवस्ती आहे. येथील वृध्द नागरीकांसह रुग्ण, गर्भवती महिलांना दवाखाण्यात जाताना मोठी कसरत करावी लागत असे. मात्र आता येथून चारचाकी वाहने डोंगर चढून थेट गावात येत आहेत. त्यामुळे ग्रामस्त सुखावले आहेत.

यावेळी आ. धैर्यशिल पाटील म्हणाले की दुर्गम व डोंगरभागातील उसर गाव हे टोकाचे गाव असून लोकसंख्येचे प्रमाण कमी असल्याने शासनयोजनेच्या अटिशर्तीनुसार या गावाला रस्ता देणे कठीण होते. अखेर अथक प्रयत्नानंतर आदिवासी मंत्री यांच्या सहकार्याने आदिवासी विकास बजेट निधीच्या वापरातून या रस्त्याला कोट्यावधीचा निधी उपलब्ध होवून रस्त्याचे काम मार्गी लागत आहे. उसर गावाला रस्ता व्हावा याकरीता दानशूर व सेवाभावी वृतीने शेतजमीन देणार्‍या शेतकरी तानाजी फसाळे, देवू फसाळे, बाळू फसाळे, राम लेंडी आदी शेतकर्‍यांचा आ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमास आ. धैर्यशिल पाटील, रा. जि. प सदस्य सुरेश खैरे, शे. का. प ज्येष्ठ नेते महादेव मोहिते, देशपांडे, पाली-सुधागड पंचायत समिती सदस्य सविता हंबीर, पाली सरपंच जनार्दन जोशी, पुरोगामी युवक संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष अरिफ मनियार, माजी सरपंच समृध्दी यादव, माजी सरपंच चंद्रकांत शिद, सुभाष दंत, पाली ग्रा. पं. सदस्य राजश्री कोंजे, पराग मेहता, सुधीर साखरले, संदेश सोनकर, प्रशांत नागोठकर आदिंसह पदाधिकारी व ग्रामस्त उपस्थित होते. 

पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाला गती
उसर हे निसर्गरम्य व मनमोहक असे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी बारमाही निसर्गदत्त पाण्याचा झरा आहे. येथे पर्यटक येत असतात. याबरोबरच येथे वरदायीनी देवीचे जागृत देवस्थान असल्याने धार्मीकदृष्ट्या देखिल उसर गावाचे अनन्यसाधारण महत्व आहे. उसर गाव आता रस्त्याने जोडले गेल्याने आता येथील पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाला चालणा मिळणार आहे. तसेच शहरात दळणवळण करणे सुलभ होणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The road to the village of Usher has got good