रोहिणी बोट दुर्घटना : ४६ वर्षांनंतरही त्या आठवणींनी अंगावर काटा

रोहिणी बोट दुर्घटना : ४६ वर्षांनंतरही त्या आठवणींनी अंगावर काटा

देवगड - कोकण किनारपट्टीवरील प्रवासी वाहतूक करणारी ‘रोहिणी’ बोट राजकोटजवळ (ता. मालवण) बुडाली. या घटनेला रविवारी (ता. २३) ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. बोट बुडतानाचा थरार अनुभव आजही ताजा आहे. दुर्घटनाग्रस्त ‘रोहिणी’ बोटीतील प्रवासी प्राथमिक शिक्षक दत्तात्रय नारायण चव्हाण हे त्याचे साक्षीदार आहेत. कारकिर्दीच्या सुरवातीलाच त्यांच्या वाट्याला हा अनुभव आला. आजही त्या क्षणाची आठवण आली तर आपल्या अंगावर काटा उभा राहतो, असे ते सांगतात.

कोकण किनारपट्टीवरील सर्वाधिक स्वस्त आणि सुरक्षित म्हणून जलवाहतूक चाले. समुद्रामार्गे व्यापारालाही मोठे महत्त्व होते. गलबतामधून मालवाहतूक चालत असे. प्रवासी वाहतुकीलाही त्यावेळी अधिक प्रतिसाद असे. विविध प्रवाशी बोटीने मुंबई-गोवा प्रवास करीत. प्रवासी वाहतूक करणारी ‘रोहिणी’ बोट २३ डिसेंबर १९७२ रोजी राजकोटजवळ बुडाली.

जीवनातील शेवटचा जलप्रवास...
दरम्यान, मालवण बंदरातील मच्छीमारी नौकांनी दुर्घटनाग्रस्त बोटीपर्यंत पोचून प्रवाशांची सुखरूप सुटका केली; मात्र तेव्हापासून कोकणमधली जलवाहतूक बंद झाली. माझ्या जीवनातील तो शेवटचा जलप्रवास ठरल्याचे श्री. चव्हाण सांगतात.

दरम्यान, प्राथमिक शिक्षक म्हणून येथील दत्तात्रय चव्हाण यांची १३ नोव्हेंबर १९७२ मध्ये मसुरे चांदेर (ता.मालवण) येथून कामाला सुरुवात झाली. रोहिणीतील तो प्रवास चव्हाण यांच्या आजही डोळ्यांसमोर आहे. शनिवार असल्याने २३ डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास रोहिणी बोटीने ते मालवण बंदरातून देवगडला जाण्यास निघाले. प्रवाशांना घेऊन बोट बंदरातून बाहेर पडतानाच कप्तानाचा बहुदा अंदाज चुकला. बोट पाण्याखालील एका खडकावरून गेल्याने तिच्या तळाचा भाग फुटला. धडकेमुळे मोठा आवाज झाला आणि बोटीत समुद्राचे पाणी शिरू लागले. त्यावेळी चव्हाण बोटीच्या डेकवर होते. बोटीच्या तळमजल्यावर पाणी येऊ लागल्याने हाहाकार माजला आणि प्रवासी ओरडत वर येण्यास धडपडत होते. कोणाला काही समजत नव्हते. 

बोटीने तोपर्यंत समुद्रातून राजकोटकडे आपला प्रवास सुरू केला होता. बोटीतील दिवे बंद झाले होते. बोट तोपर्यंत राजकोट भागातील खडकांमध्ये आली होती. बोटीचे इंजिन बंद असल्याने ती एका खडकामध्ये तिरपी होऊन थांबली. बोटीवरील एका बाजूकडील दोन लाईफ बोट पाण्यात सोडण्यात आल्या. त्यामध्ये प्रवाशांना उतरवले जात असताना प्रत्येकजण प्रथम जाण्यासाठी धडपडत होता. 

दुर्घटना घडताच माझ्यासह अन्य काही जणांनी पुरुषांना बाजूला करून महिला, मुले तसेच वृद्धांना प्रथम प्राधान्य देऊन उतरण्यासाठी साहाय्य केले. तत्पूर्वी, सर्व प्रवाशांना दिलेली लाईफजॅकेट माझ्यासह इतरांनी बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बांधली होती. आजही ४६ वर्षांनंतर ती घटना आठवली की अंगावर शहारे येतात.
- दत्तात्रय चव्हाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com