सुरुंग स्फोटामुळे सिंधुदुर्गातील निगुडेत छप्पर कोसळले

सुरुंग स्फोटामुळे सिंधुदुर्गातील निगुडेत छप्पर कोसळले

बांदा - प्रचंड ताकदीच्या भूसुरुंग स्फोटामुळे निगुडे-जुनी देऊळवाडी येथील गुणाजी वासुदेव गवंडे यांच्या घराचे छप्पर कोसळले. बाजूच्याच खोलीत उपसरपंच गुरुदास गवंडे, त्यांचे वडील व आई झोपले असतानाच ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तिघेही बालंबाल बचावले.

महसूल प्रशासनाने ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. प्रशासनाला हाताशी धरून क्वारीचालकांची मुजोरगिरी सुरूच असून, यावर निर्बंध न आणल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा निगुडे सरपंच समीर गावडे यांनी दिला आहे.

सोनुर्ली, वेत्ये सीमेवर निगुडे गावालगत क्वारीचालकांची मुजोरगिरी सुरू आहे. प्रचंड ताकदीचे भूसुरुंग स्फोट करण्यात येत असल्याने निगुडे गावातील सुमारे १५६ घरांना तडे गेले आहेत. नुकताच महसूल प्रशासनाने या नुकसानीचा पंचनामा केला होता. सावंतवाडी तहसील कार्यालयात तहसीलदार, निगुडे ग्रामस्थ व क्वारीचालकांची बैठक होऊन क्वारीचालकांना आचारसंहिता आखून देण्यात आली होती; मात्र तहसीलदारांच्या आचारसंहितेचे पालन क्वारीचालक करताना दिसत नाहीत. प्रचंड ताकदीचे सुरुंग स्फोट घडविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. महसूल प्रशासन मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

काल दुपारी गवंडे कुटुंबीय दुपारचे जेवण आटोपून विश्रांती घेत असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात गवंडे यांच्या एका खोलीचे छप्पर कोसळले. गवंडे कुटुंबीय वेळीच घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. आज या घटनेचा महसूल प्रशासनाने पंचनामा केला. यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे, पोलिसपाटील सुचिता मयेकर, तलाठी आर. एन. गुणात, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मयेकर उपस्थित होते. या दुर्घटनेत गवंडे यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

‘‘गावात क्वारीचालकांची अक्षरशः दादागिरी सुरू आहे. याबाबत महसूल प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले. पत्रव्यवहारही केला; मात्र महसूल प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याचेच दिसून येते. महसूल व क्वारीचालकांचे साटेलोटे आहेत. भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेस महसूल यंत्रणा जबाबदार राहील. प्रसंगी ग्रामस्थांसमवेत आम्ही जनआंदोलन उभारणार आहोत.’’
- समीर गावडे, सरपंच निगुडे

‘क्वारीचालकांकडून होणाऱ्या सुरुंग स्फोटांकडे खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून क्वारी बंद करण्यासाठी ओरोस येथे खास बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते; मात्र प्रत्यक्षात कार्यवाही काहीच केली नसून क्वारीचालकांची मुजोरगिरी हे खासदार राऊतांचे अपयश आहे.’’
- गुरुदास गवंडे, उपसरपंच निगुडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com