वाहक कमतरतेमुळे फेऱ्या होतायत रद्द!

Rounds of bus cancelled because unavailability of conductor
Rounds of bus cancelled because unavailability of conductor

देवगड - येथील आगारातील वाहकांच्या कमतरतेमुळे लांबपल्यासह तालुक्‍यातील काही महत्वाच्या फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. सध्या गर्दीचा हंगाम असल्याने अचानक रद्द होणाऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठी गैरसोय सोसावी लागत असल्याचे चित्र आहे. योग्य नियोजनाअभावी रद्द होणाऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना कसरत करत पुढे मार्गस्थ व्हावे लागत असल्याचेही दिसते.

खासगी वाहतुकीशी स्पर्धा करताना एसटीही आपल्या सेवेत वेळावेळी बदल घडवत असते. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एसटीकडून विविध उपाय योजना राबवल्या जात असल्याचेही दिसते. हे एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र नियोजनाअभावी प्रवाशी असतानाही फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढवत असल्याचेही दिसते. सध्या शाळांना सुट्टी पडल्यामुळे स्थानिक वर्दळीत वाढ झाली आहे. लग्न आदी विविध कार्यक्रमानिमित्त प्रवाशांची वर्दळ सुरू असते. गावी आलेल्या चाकरमान्यांचे आपल्या नातेवाईकांकडे जाणे -येणे सुरू असते. सुट्टी असल्याने प्रवासाचे बेत आखले जातात. मात्र आगारातून केव्हा कुठली गाडी बंद केली जाईल याचा नेम नसल्याने प्रवाशांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. प्रवाशांच्या नियोजित वेळेत त्यांना इच्छित स्थळ गाठणे काहीवेळा गैरसोयीचे ठरते. रेल्वे तसेच अन्य मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनाही कसरत करीत प्रवास करावा लागतो.

सध्या येथील आगारामध्ये प्रत्येकी 128 चालक, वाहकांची आवश्‍यकता आहे. मात्र सद्यस्थितीत 117 चालक व 102 वाहक कार्यरत आहेत. त्यातही चालक, वाहकांची साप्ताहिक सुट्टी आणि रजा असते. त्यामुळे त्यामध्ये आणखीनच कमतरता भासते. त्यामुळे वाहकांची संख्या कमी पडत असल्याने काही फेऱ्या बंद केल्या जात असल्याचे दिसते. मात्र प्रवाशांना याची आगावू कल्पना नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. याबाबत आगारातील वाहतुक निरीक्षक एस. ए. तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, आगारात चालकांची कमतरता भासत नाही. गरज भासल्यास त्यांची ड्यूटी संपली तरी त्यांना पुन्हा दुसऱ्या फेरीसाठी पाठवता येते. मात्र वाहक कमी असल्याने फेऱ्या बंद ठेवाव्या लागत आहेत. यामध्ये तालुक्‍यातील फेऱ्यांबरोबरच काही लांबपल्याच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत.

उत्पन्नावर परिणाम?
सध्या गर्दीचा हंगाम असल्याने एसटी फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. स्थानिक फेऱ्यांबरोबरच काही लांबपल्याच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. मात्र वाहकाअभावी फेऱ्या बंद ठेवाव्या लागत असल्याने त्याचा एकूणच परिणाम आगाराच्या उत्पन्नावर होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com