भारताच्या उत्थानाकरिता छ.शिवरायांची प्रेरणाच गरजेची : डॉ. मोहन भागवत

सुनील पाटकर
शनिवार, 31 मार्च 2018

पुणे येथील छत्रपती शिवाजी रायगड स्मारक मंडळ व महाड येथील स्थानिक उत्सव समितीच्या वतीने रायगडावर दरवर्षीप्रमाणे ही पुण्यतिथी साजरी करण्यात येते. आज रायगडावर छ.शिवाजी महाराज यांच्या 338 व्या पुण्यतिथीनिमित्त हजारो शिवप्रेमींनी छ.शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

महाड : रायगड किल्ला हे स्वातंत्र्याचे आणि विजयाचे प्रतिक आहे. केवळ महाराष्ट्रापुरतेच नाही तर छत्रसाल राजा, बुंदेलखंड, रजपूत, आसाम, बंगाल येथील राजांना स्वधर्माचे राज्य स्थापन करण्याची प्रेरणा शिवरायांनी दिली. भारताच्या उत्थानाकरिता छ.शिवरायांची प्रेरणाच गरजेची असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज रायगडावर व्यक्त केले.

पुणे येथील छत्रपती शिवाजी रायगड स्मारक मंडळ व महाड येथील स्थानिक उत्सव समितीच्या वतीने रायगडावर दरवर्षीप्रमाणे ही पुण्यतिथी साजरी करण्यात येते. आज रायगडावर छ.शिवाजी महाराज यांच्या 338 व्या पुण्यतिथीनिमित्त हजारो शिवप्रेमींनी छ.शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

शिवप्रेमींचा जयघोष, शाहिरांचे पोवाडे, भजन आणि कीर्तन अशा वातावरणात ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पहाटे जगदिश्वराचे पूजन करण्यात आले. ध्वजारोहण, शिवसमाधीपूजन व हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महाडचे आमदार भरत गोगावले, आमदार विनायक मेटे, आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम उपस्थित होते. डॉ.मोहन भागवत यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.

डॉ.मोहन भागवत यांनी संपूर्ण रायगड हेच आपल्यासाठी मार्गदर्शन आहे. शिवराय हे जागतिक प्रेरणा केंद्र असल्याचे सांगत, जगात अन्यायाच्या विरोधात लढताना अनेक राष्ट्रे आणि संघटनादेखील छ.शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील शिवरायांचा आदर्श ठेवला असल्याचे सांगितले.

रवींद्र चव्हाण यांनी रायगड संवर्धनामुळे भविष्यात रायगड आणि रायगड परिसराचा कायापालट आपणास पहावयास मिळेल, असा विश्वासदेखील व्यक्त केला. यावेळी गडारोहण स्पर्धेतील पहिल्या विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले.

मंडळाच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा श्री शिवपुण्यस्मृती पुरस्कार हा शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर यांना देण्यात आला आहे. तर विशेष मरणोत्तर पुरस्कार दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांना जाहीर करण्यात आला होता. डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते निवृत्त मेजर जनरल मनोज ओक आणि जेधे कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवमुद्रा या स्मरणिकेचेदेखील प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवरायांची पालखी टाळ मृदुगांच्या गजरात  व जयघोषात शिवसमाधीस्थळाकडे नेण्यात आली.

या ठिकाणी पोलिसांनी सलामी दिली. हा कार्यक्रम संपताच डॉ. मोहन भागवत थेट पाचाड येथील राजमाता जिजामाता समाधी स्थळाकडे गेले. याठिकाणी त्यांनी राजमाता जिजामाता समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सामाजिक क्रांतीचे ठिकाण असलेल्या चवदारतळे येथे भेट दिली.

Web Title: RSS Chief Mohan Bhagwat says good thoughts about Shivaji Maharaj