नियमांच्‍या कचाट्यात बाळंतिणीची फरफट

नियमांच्‍या कचाट्यात बाळंतिणीची फरफट

दोडामार्ग - वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या असहकार्य व आडमुठ्या धोरणामुळे ग्रामीण भागातील बाळ-बाळंतिणीची हेळसांड झाली; शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनाही मनस्ताप सहन करावा लागला. केवळ आपल्या आरोग्य केंद्रात प्रसूती झाली नाही म्हणून त्या दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन दिवसाच्या बाळाला व तिच्या आईला रुग्णालयात ठेवून घेण्यास नकार दिला. खासगी रुग्णालयात ठेवण्याजोगी आर्थिक परिस्थिती नसल्याने ती महिला नवजात बाळासह माहेरी राहत आहे. हा प्रकार तालुक्‍यातील एका आरोग्य केंद्रात घडला.

तळकट झोळंबे परिसरातील एका महिलेची प्रसूतीची संभाव्य तारीख उलटून गेल्याने त्या महिलेला सावंतवाडी येथील स्त्रीरोगतज्ज्ञ ज्ञानेश्‍वर दुर्भाटकर यांच्याकडे नेण्यात आले; पण प्रसूतीची लक्षणे दिसत नसल्याने त्यांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला. खासगी रुग्णालयात सोनोग्राफी केल्यावर त्यांनी १८ जानेवारी तारीख दिली व तोपर्यंत रुग्णालयातच राहण्यास सांगितले.

खासगी रुग्णालयात राहणे परवडणार नसल्याने त्यांनी डॉ. दुर्भाटकर यांना सोनोग्राफीचा रिपोर्ट दाखवला व त्यांची सूचना सांगितली. त्यांनीही रुग्णालयात राहणे गरजेचे असल्याचे सांगून सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात ॲडमिट करून घेतले. त्या महिलेची १६ जानेवारीला नैसर्गिक प्रसूती झाली. रुग्णसंख्या सतत वाढती असल्याने नैसर्गिक प्रसूती झालेल्यांना तीन दिवसांनी डिस्चार्ज दिला जातो. तसा डिस्चार्ज दिल्यावर ग्रामीण भागात सोयी सुविधा नसल्याने तिच्या घरच्यांनी तिला तालुक्‍यातील आरोग्य केंद्रात काही दिवस वरून ठेवण्याचा विचार केला.

त्यासाठी बांदा कळणे मार्गावरील महिला वैद्यकीय अधिकारी असलेल्या आरोग्य केंद्रात त्यांना आणायचे का याबाबत विचारणा केली. तळकट आरोग्य केंद्रात माकडतापाच्या रुग्णांची वर्दळ असल्याने त्यांनी तळकट ऐवजी ‘ते’ आरोग्य केंद्र निवडले; पण त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्याकडे रुग्ण यायचे आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी जागा नसल्याचे सांगितले. नातेवाइकांनी गयावया केली. ते रुग्ण आल्यावर आम्ही जाऊ, तोपर्यंत तरी ठेवा असे सांगितले; पण त्यांनी ऐकले नाही. असाच प्रकार जवळच्याच एका गजबजलेल्या ठिकाणच्या आरोग्य केंद्रातही घडला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानेही विविध कारणे देत त्या बाळ-बाळंतिणीला प्रवेश देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे नातेवाइकांनी तालुक्‍यातील एका जिल्हास्तरीय लोकप्रतिनिधीला फोन लावला. कदाचित महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांच्या शब्दालाही मान दिला नसावा म्हणून त्यांनी त्या आरोग्य केंद्राऐवजी तळकटचा पर्याय सुचवला; पण नातेवाइकांना तळकट जवळ असूनही माकडतापाच्या भीतीपायी तेथे जाणे त्यांनी टाळले. दुसरीकडे सावंतवाडीतून त्यांना डिस्चार्ज दिला असल्याने पर्यायी व्यवस्था करणे भाग होते; पण खासगी रुग्णालयाचा खर्च परवडणार नसल्याने नातेवाइकांनी अखेर त्या बाळाला आपल्या आईसोबत मणेरी येथे आजोळला नेऊन ठेवले. कारणे काहीही असोत पण आरोग्य अधिकाऱ्यांच्या असहकार्य व आडमुठ्या धोरणामुळे नव्याने जगात प्रवेश घेतलेल्या कोवळ्या जीवाला मुजोर व्यवस्थेचा व असंवेदनशीलतेचा पहिला अनुभव आला. 

जननी सुरक्षेचा गाजावाजा
जननी सुरक्षेचा गाजावाजा करीत बाळ आणि बाळंतिणीची आपण काळजी घेतो असा डंका पिटणाऱ्या राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा हा कारभार त्यांच्या घोषणा किती फसव्या आणि निरुपयोगी आहेत यावर प्रकाश टाकणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com