ग्रामीण जनतेला आजही विकासाची आस

zp-election
zp-election

सावंतवाडी - पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीचे बिगुल आता वाजले आहे; मात्र ग्रामीण भागातील अनेक प्रभाग आजही खऱ्या विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. महात्मा गांधींचा ‘खेड्याकडे चला’ या संदेशापासून पंतप्रधानांच्या ‘सब का साथ सब का विकास’चा उद्देश आता तरी पूर्ण होऊन ग्रामीण भागाचे परिवर्तन होईल का, असा सवाल जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला पडला आहे. लोकप्रतिनिधींची बरीच आश्‍वासने हवेतच विरून गेल्यामुळे मतदानावर होणाऱ्या परिणामाची जाणीव ठेवून पक्षांची उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांचा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी कस लागणार आहे, हे नक्की. 

जिल्ह्याचा आजही हवा तसा विकास झालाच नसल्याचे चित्र येथील विविध प्रकारच्या समस्या पाहिल्यास लक्षात येते. तालुक्‍याचा विचार करता सावंतवाडी ६३, दोडामार्ग ३६, वेंगुर्ला ३०, कुडाळ ६८, देवगड ७२, मालवण ६३, कणकवली ६३, वैभववाडी ३४ अशी मिळून जिल्ह्यात एकूण ४२९ गावे आहेत. शिवाय छोट्या-मोठ्या वाड्यावस्त्याही आहेत; परंतु बऱ्याच ठिकाणी आजही चांगले रस्ते नाहीत. रस्ते आहेत पण त्यावर डांबर नाही. काही ठिकाणी तर नुसत्या लाल वाटाच आहेत. अशी रस्त्याची परिस्थिती आज आहे. लोकप्रतिनिधींना याची पूर्ण जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष होते. मागील निवडणूक प्रचाराआधी केलेल्या घोषणा पुढच्या निवडणुकीतही पूर्ण न होऊ शकल्यामूळे जनता मात्र नाराज आहे. जिल्ह्यात ८ पंचायत समित्यांसाठी निवडणुका होत आहेत. जिल्ह्याचा बहुसंख्य भाग डोंगरी असल्यामुळे येथे सुरळीत प्रकारची मोबाईल सेवा, इंटरनेट सेवा आजही नाही. एकीकडे ग्रामपंचायतींना डिजिटलायझेशनकडे वळविले जात असताना जनतेला संपर्काची पुरेशी साधने उपलब्ध करून देण्यास लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात पुरेशा पथदिव्यांची सोय नाही. काही ठिकाणी नळ योजना, विहिरीचे प्रकल्प अजूनही प्रस्तावित आहेत. लोकांना पाण्यासाठी आजही दूरपर्यंत पायपीट करावी लागते, त्यातच अरुंद रस्त्याच्या समस्येमुळे बस सेवाही बऱ्याच गावात कार्यान्वित नाही. या सर्व गोष्टींचा सामाजिक व शैक्षणिक घटकांवर परिणाम दिसून येत आहे. एकंदरीत ग्रामीण भागात अशी स्थिती कायम असूनही निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधी मात्र रस्ते, इमारतीच्या कामांचे भूमिपूजन करून जनतेवर आपला प्रभाव टाकण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून झाले. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जरी गावभेटी घेतल्या जात असल्या तरी ग्रामीण जनताही गतवेळेच्या निवडणुकीत जाहीरनाम्यातून किती उद्दिष्टपूर्ती झाली आणि किती नाही याची जाणीव ठेवून आहे. बऱ्याच ठिकाणची जनता मात्र निवडणूक प्रचार काळात येणाऱ्या उमेदवारांना विकासकामांच्या मुद्‌द्‌यावरून धारेवर धरण्याच्या तयारीत आहे. खेडेगावातील मागासवर्गीय वस्त्यांची कधी आठवणही न काढणारे स्थानिक लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा भूलथापा मारण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु फक्त आश्‍वासनांचे राजकीय सरबत पाजणाऱ्या या लोकप्रतिनिधींना कोणते जाब विचारावेत, कोणते प्रश्‍न उपस्थित करावेत, याचा सर्व विचार करून मतदार प्रचारकांची वाट पाहत आहेत. 

मतदानाची अनास्था लोकप्रतिनिधींमुळेच
आजही बरीच ग्रामीण जनता अशिक्षित आहे. लोकप्रतिनिधी ग्रामीण जनतेच्या अडाणीपणाचा फायदा फक्त मतासाठी घेतात. सर्व ग्रामपंचायतीत प्रत्येक निवडणुकीवेळी मतदार यादी जाहीर करण्यात येते; परंतु मतदार यादीतील सर्व जण मतदानाचा हक्क बजावत नाहीत. याला मुख्य कारण म्हणजे जनतेची केलेली फसवणूक. आधीच ग्रामीण भाग बऱ्याच समस्यांनी ग्रस्त आहे, त्यातच छोट्या आश्‍वासनांची पूर्तताही न केल्यामुळे अशिक्षित जनताही लोकप्रतिनिधी लक्षात घेता कोणालाच मत द्यायचे नाही, असा पवित्रा घेते. त्यामुळे अशिक्षितपणापासून मतदानाबद्दलच्या अनास्थेपर्यंतचे हे चक्र असेच चालूच राहते, याला सर्वस्वी लोकप्रतिनिधींची खोटी आश्‍वासनेच कारणीभूत ठरतात, याचा विचार करणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com