शिवसेनेच्या गुहागर तालुकाप्रमुखपदी सचिन बाईत यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

गुहागर - विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने गुहागर तालुकाप्रमुखपदी सचिन बाईत यांची निवड केली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर तालुकाप्रमुख होते. अचानक झालेल्या या बदलामुळे शिवसेनेच्या गोटातून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गुहागर - विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने गुहागर तालुकाप्रमुखपदी सचिन बाईत यांची निवड केली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर तालुकाप्रमुख होते. अचानक झालेल्या या बदलामुळे शिवसेनेच्या गोटातून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महेश नाटेकर जवळपास साडेचार वर्षे तालुकाप्रमुख होते. गुहागर शिवसेनेतील दोन गटांचे एकत्रीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्याच कार्यकाळात प्रथमच तालुक्‍यातून एक जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य, जिल्हा बॅंकेवर डॉक्‍टर जोशींच्या रूपाने शिवसेनेचे संचालक निवडून आले. लोकसभेच्या निवडणुकीत अनंत गीतेंना गुहागर विधानसभा क्षेत्रात मताधिक्‍य मिळाले. असे असताना अचानकपणे गुहागरचा तालुका प्रमुख बदलला. 

आबलोलीतील उद्योजक सचिन बाईत यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. कुशल संघटक, मोठा जनसंपर्क, ग्रामीण भागातील समस्यांची जाण असलेला विनयशील कार्यकर्ता अशी सचिन बाईत यांची ओळख आहे. आबलोली पंचक्रोशीत अनेक सामाजिक कामे त्यांनी स्वखर्चाने केली आहेत. मात्र आजपर्यंत त्यांना तालुक्‍याचे नेतृत्व करण्याची संधीच मिळाली नव्हती. रविवारी सकाळी अनंत गीते यांनी दूरध्वनी करून बाईत यांना तालुकाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याची माहिती दिली. तोपर्यंत बाईत यांनीही याबद्दल माहिती नव्हती. या नियुक्तीबद्दल अनेक शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अनपेक्षित आणि आश्‍चर्यकारक अशी ही बातमी आहे. शिवसेनेमध्ये कोणाचेही लाॅबिंग चालत नाही. हेच या घटनेमुळे सर्वांना कळले असेल. आजपर्यंत सच्चा शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम करत होतो. सर्वांना सोबत घेऊन सन्मान देऊन विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ताकद वाढवण्यावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख येथे जो उमेदवार देतील त्याला बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन.
- सचिन बाईत,
तालुकाप्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Bait as Shivsena Guhagar Taluka president