मार्ग निर्धोक; वेळापत्रक विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

कणकवली : जूनच्या मध्यानंतर धुवॉंधार कोसळणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले असले, तरी रेल्वे मार्ग अद्याप निर्धोक राहिला आहे. यात मुंबईहून कोकणात येणाऱ्या बहुतांश गाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावत आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या एक तास विलंबाने पोचत आहेत.

कणकवली : जूनच्या मध्यानंतर धुवॉंधार कोसळणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले असले, तरी रेल्वे मार्ग अद्याप निर्धोक राहिला आहे. यात मुंबईहून कोकणात येणाऱ्या बहुतांश गाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावत आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या एक तास विलंबाने पोचत आहेत.
यंदा सरासरीपेक्षा जादा पाऊस होण्याची शक्‍यता असल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच संभाव्य दरड कोसळणाऱ्या ठिकाणी पाण्याची निचरा व्यवस्था केली. पोमेंडी, निवसर येथील डोंगरांचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आले. याखेरीज ओरोस, बोर्डवे या ठिकाणीदेखील नव्याने बोल्डर नेटची कामे करण्यात आली आहेत. यामुळे आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनदेखील कोकण रेल्वेचा मार्ग सुरक्षित राहिला आहे.

गेले पाच-सहा दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सर्वच गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. यात कोकण रेल्वेचे वेळापत्रक मात्र विस्कळित झाले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी, दिवा पॅसेंजर या गाड्या दररोज सरासरी दोन ते तीन तास विलंबाने पोचत आहेत, तर क्रॉसिंग आणि धिम्या वेगामुळे मुंबईला पोचणाऱ्या गाड्यादेखील एक ते दीड तास विलंबाने धावत आहेत. 
कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा 36 ठिकाणे डेंजर म्हणून घोषित केली आहेत. या सर्व ठिकाणांवर चोवीस तास गस्त ठेवण्यात आलीय. याखेरीज या धोकादायक कड्यांच्या बाजूला "रेड सेन्सर‘सारखी अद्ययावत यंत्रणा लावण्यात आली आहे. तेथे दरड अथवा दगड कोसळला, तर त्याची सूचना लगतच्या स्थानकात मिळणार आहे. याखेरीज प्रवाशांना प्रवासात कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे कंट्रोल रूम, वेर्णा आणि रत्नागिरी येथे मेडिकल व्हॅन सज्ज ठेवण्यात आल्याचीही माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: safe way; Schedules disrupting