कोकण किनाऱ्यांचे होणार सेफ्टी ऑडिट

राजेश कळंबटे
बुधवार, 19 एप्रिल 2017

रत्नागिरी - समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने (एमटीडीसी) गांभीर्याने पावले उचलली आहेत. वायरी दुर्घटनेप्रसंगी बचाव प्रक्रियेतील त्रुटींचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून मागविण्यात आला आहे. कोकणातील सर्वच किनाऱ्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अहवाल आल्यानंतर सुरक्षिततेच्या उपाययोजना एमटीडीसीकडून राबविल्या जातील. वायरीतील प्रकारानंतर पर्यटकांची सुरक्षा हा संवेदशील मुद्दा बनला आहे, असे एमटीडीसीचे सरव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

वायरी दुर्घटनेनंतर किनारी भागातील सुरक्षेविषयी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. वायरीत मुले बुडाल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांमध्ये कोणत्या त्रुटी आहेत, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. प्रत्येक बीचवर धोक्‍याची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. ते फलक तिथे होते का, प्रशासनाकडून व्यवस्था केली गेली होती का, याची चौकशी होणार आहे. बचावाचे काम सुरू असताना रुग्णवाहिका वेळेत पोचली असती, तर एखाद्या व्यक्‍तीचे प्राण वाचविता आले असता का, याचीही माहिती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘७० विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन शिक्षक पुरेसे पडत नाहीत. तरुण मुले असतात, त्यामुळे अशा सहली किंवा अभ्यास गटांबरोबर सक्षम आणि पुरेसा शिक्षकवर्ग असणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने भविष्यात काळजी घेतली जाईल.’’

मुरूड-जंजिरा येथील घटनेनंतर पुन्हा वायरीचा प्रकार घडला आहे. याची गांभीर्याने दखल घेतली आहे. पर्यटनमंत्र्यांनीही यावर आळा घालण्यासाठी कडक उपाय करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोकणातील सर्वच किनाऱ्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने ऑडिट करण्याचा निर्णय झाला. बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी कोणत्या सुविधा आहेत, रुग्णवाहिका किंवा आरोग्य यंत्रणा जवळ आहे का, पर्यटकांना सूचना देणारे फलक आहेत का, जीवरक्षक नेमले आहेत का, याची माहिती घेतली जाईल. त्याचा अहवाल आल्यानंतर एकही दुर्घटना भविष्यात घडणार नाही, या दृष्टीने उपाय एमटीडीसी करील, अशी ग्वाही श्री. राठोड यांनी दिली.

प्राथमिक उपायांवर चर्चा
सहली किंवा अभ्यास गटांची नोंदणी जिल्हा प्रशासनाकडे केल्यास त्यांना त्या किनाऱ्यांवर सुरक्षिततेसाठी जीवरक्षक किंवा तत्सम उपाय करता येतील. मनुष्यबळाचा विचार करता सर्वच किनाऱ्यांवर जीवरक्षक नेमता येणे शक्‍य नाही. भरतीवेळी पर्यटकांना बंदी घालणे, बीचच्या लांबीनुसार जीवरक्षकांची नेमणूक करणे, याची अंमलबजावणी करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे.

Web Title: Safety audits will Konkan beach