कोकणात ओबीसी नेतृत्वाला नाकारल्याचे दु:ख 

कोकणात ओबीसी नेतृत्वाला नाकारल्याचे दु:ख 

गुहागर - कोकणात कुणबी समाज बहुसंख्येने असला तरी विधानसभेतील प्रतिनिधीत्वापासून दूर आहे. ओबीसी नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, असे सारेच सांगतात. परंतु उमेदवारी देण्याचे कबूल करून फसवतात. जे घडले, ते कोणीही स्पष्टपणे बोलत नाहीत, याचे दु:ख आहे, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. 

बेटकर म्हणाले, आजही मी शिवसैनिक आहे. भाजपचे आमदार कै. तात्या नातू यांच्या निवडणुकीत प्रचार केला. त्यानंतर मुंबईतही शिवसेनेचे काम करत होतो. आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे. त्यांचे दर्शन घेण्याचा सन्मान मिळाला. आता व्यवसाय मुले आणि भाच्यांवर सोपवून कोकणात आल्यावर सामाजिक कार्यात झोकून दिले. जिल्हा परिषद सदस्य होईन, असे स्वप्नही पाहिले नव्हते.  जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये उमेदवार नव्हता, म्हणून मला विचारणा झाली. त्यावेळी देखील नाट्यमयरित्या माझा गट बदलला. परंतु कष्ट, लोकांचे प्रेम आणि भगवंताच्या आशीर्वादाने विजयी झालो. जिल्हा परिषदेत सभापतिपद मिळाले. शिवसेनेने अपेक्षा नसताना खूप दिले. त्यामुळे मी नाराज नाही. 

तीन वर्षांपूर्वी पालकमंत्री वायकर यांच्यासोबत विधानसभा लढविण्याबाबत चर्चा झाली. कोकणात बहुसंख्य ओबीसी समाज लक्षात घेता, त्याला नेतृत्व मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु विधानसभा लढण्याएवढे पैसे माझ्याकडे नव्हते. तरीही समाजाला मिळणारे प्रतिनिधित्व नाकारायचे नाही, म्हणून 6 महिन्यांनी मी होकार कळविला, असेही बेटकर म्हणाले. 

...याचे वाटते दु:ख 
दरम्यान, राऊत, रामदास कदम आदींबरोबर चर्चा करून वायकरांनी तू तयारी सुरू कर, असे सांगितले. म्हणून मी गुहागरवर लक्ष केंद्रित केले. समाजातील नेत्यांकडून सहमती मिळाली. परंतु भास्कर जाधवांची घरवापसी झाली. त्यांना गुहागरमधून लढायचे आहे, म्हटल्यावर माझे नाव मागे पडले. यामुळे नाराज नव्हतो. परंतु भुतकाळाबद्दल स्पष्टपणे कोणी बोलत नाही. फसवणुकीबद्दल अवाक्षर काढत नाही. याचे दु:ख वाटते. पक्ष बदलून निवडणूक लढवणार नाही, असेही बेटकर यांनी बोलून दाखवले. 

पक्षांतराच्या चर्चा खोट्या 
मध्यंतरी भाजप आमदार प्रसाद लाड भेटले. त्यावेळी ओबीसींना प्रतिनिधीत्व यावर चर्चा झाली. निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. बेटकर नाराज, राष्ट्रवादीतून निवडणूक लढविणार, तटकरेंच्या संपर्कात अशाही चर्चा झाल्या. आजपर्यंत तटकरेंशी फोनवरही बोलणे झाले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com