सहदेव बेटकरांवर सेनेची बारीक नजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

रत्नागिरी - शिवसेनेचे जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण समिती सभापती सहदेव बेटकर अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करताना आम्ही छायाचित्रांमध्ये पाहिले. या सर्व प्रकरणाची पडताळणी केली जाईल. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. काही चुकीची पावले उचलली, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी ‘सकाळ’ला दिली. 

रत्नागिरी - शिवसेनेचे जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण समिती सभापती सहदेव बेटकर अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करताना आम्ही छायाचित्रांमध्ये पाहिले. या सर्व प्रकरणाची पडताळणी केली जाईल. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. काही चुकीची पावले उचलली, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी ‘सकाळ’ला दिली. 

सहदेव बेटकर शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. संगमेश्‍वर तालुक्‍यातील जिल्हा परिषद गटातून ते जिल्हा परिषदेवर आले. सेनेतील ज्येष्ठतेचा विचार करून त्यांची अर्थ व शिक्षण सभापतिपदी वर्णी लागली. भविष्यातील राजकीय बांधणी म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बेटकर यांनी गुहागर तालुक्‍यात अनेक विकासकामे केली.

शिवसेनेनेही त्यांना गुहागरमधून विधानसभेची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. त्यादृष्टीने बेटकर यांनी गुहागरात पेरणी केली. परंतु गुहागरात मोठे राजकीय फेरबदल झाले. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करताना त्यांना गुहागरमधून पुन्हा सेनेतून संधी देण्याच्या अटीवर हा प्रवेश झाल्याची चर्चा आहे. 

पक्षाने बेटकर यांना शब्द देऊन आयत्या वेळेला शब्द फिरविल्याचे बेटकऱ्यांच्या जिव्हारी लागले. त्यानंतर त्यांच्या सर्व हालचालीमध्ये मोठा बदल झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार सुनील तटकरे आणि आता आमदार संजय कदम यांची बेटकरांनी भेट घेतल्याची छायाचित्र प्रसिद्ध झाली आहेत. राष्ट्रवादीबरोबर बेटकरांची जवळीक वाढत चालल्याने सेनेतील खलबते वाढली आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीतील या हालचालीमुळे शिस्तप्रिय सेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हालचालींवर लक्ष
शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सहदेव बेटकर यांचे इतर राजकीय पक्षांशी जवळीक वाढल्याचे आम्ही पाहत आहोत. याची शहानिशा केली जाईल. आतापर्यंत त्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. त्यांच्या सर्व हालचालींवर लक्ष आहे. खात्री करूनच पुढील कारवाई केली जाईल. सभापतिपदाचा राजीनामा घेण्यापासूनची ही कारवाई असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahadev Betkar under Shivsena observation