वेंगुर्लातील "सेंट लुक्‍स' सुरू होणार तरी कधी?

saint luke's hospital issue vengurla
saint luke's hospital issue vengurla

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - एकेकाळी अख्ख्या कोकणसाठी लाईफलाईन असलेले वेंगुर्लेचे "सेंट लुक्‍स हॉस्पिटल' पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथे ओपीडी सुरू करण्यासाठी मागील 6 महिन्यांपूर्वी प्रयत्न केले गेले. अगदी पालकमंत्र्यांपासून जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी हे हॉस्पिटल सुरू होईल, अशी ग्वाही दिली होती. इमारतीतील सुस्थितीतील असलेल्या दोन खोल्यांची रंगरंगोटी व परिसराची साफसफाईही करण्यात आली; परंतु आता प्रयत्न थंडावले आहेत. कोकणच्या आरोग्य विश्‍वाची अस्मिता असलेले हे रुग्णालय पुन्हा सुरू होईल की नाही? अशी साशंकता आता वेंगुर्लेवासीयांना आहे. 
 

लाईफलाईन ठरलेले हॉस्पिटल 
वेंगुर्लेचे भूषण असलेले सेंट लुक्‍स हॉस्पिटल हे एकेकाळी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा (सिंधुदुर्गासह) आणि गोव्यासाठीचे सर्वाधिक अद्ययावत सोयींनीयुक्त असे हॉस्पिटल होते. यातील सेवाभावी मिशनरी डॉक्‍टर हे जणू लोकांना त्यावेळी देवदूत वाटायचे. 1903 मध्ये डॉ. मार्शल यांनी रामेश्‍वर मंदिरानजीक दवाखाना सुरू केला. त्यानंतर 1907 मध्ये डॉ. गोहीन दाम्पत्य वेंगुर्ले येथे आले व त्यांनी 1910 मध्ये आजच्या गाडेकर कन्याशाळा असलेल्या जागेत दवाखाना सुरू केला. कोल्हापूर डायसिस कौन्सिल या संस्थेने आताची सेंट लुक्‍सची जागा विकत घेत त्या ठिकाणी 1912 पासून हे हॉस्पिटल सुरू केले. प्लेगच्या साथीत या हॉस्पिटलने फार मोठी कामगिरी बजावली होती. त्यावेळच्या भयाण असलेल्या आजारांपैकी क्षयरोग, कुष्ठरोग यांसाठीही निवासी सोयी केल्या होत्या. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्या काळातील रोगराईमध्ये या हॉस्पिटलने केलेले कार्य आठवणींच्या रूपाने जुन्या जाणत्या नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. अलीकडे मात्र बरीच वर्षे हे हॉस्पिटल बंद स्थितीतच आहे. 

पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न 
मधल्या काळात हे रुग्णालय बंद पडले. ते पुन्हा सुरू होण्यासाठी वेंगुर्ल्याचे सुपुत्र सगुण तथा आबा नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भरीव देणगी दिली होती. यासाठी येथील ज्येष्ठ पत्रकार (कै.) श्रीधर मराठे यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला होता. अमेरिकन संस्था, डॉ. सिटन यांनीही वस्तुरुपाने देणग्या दिल्या. सुसज्ज आयसीयू युनिट, सुतिकागृह, शल्य चिकित्सा विभाग, नर्सिंग कॉलेज या सुविधा 2009 मध्ये सुरू झाल्या होत्या. 2008 च्या सुमाराला डॉ. दास यांना नियुक्त करून सेंट लुक्‍स पुन्हा सुरू झाले; परंतु काही अप्रिय घटना आणि वैयक्तिक कारणांनी डॉ. दास यांनी राजीनामा दिला. 2011 पासून पुन्हा सेंट लुक्‍सची रुग्ण सेवा खंडित झाली.

अत्याधुनिक मशिनरी असूनदेखील डॉक्‍टरांअभावी हे हॉस्पिटल बंद स्थितीतच राहिले. पुढे डॉ. द्वारकानाथ कोटणीस कृती समितीचे सचिव अतुल हुले, विश्‍वस्त दादासाहेब परुळकर, भाई मंत्री यांनीदेखील सेंट लुक्‍स हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. सेंट लुक्‍स कार्यरत असलेल्या जागेवर डॉ. कोटणीस रुग्णालय होऊ शकते का ? याचीही चाचपणी झाली; परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. केंद्रीय मंत्री असताना सुरेश प्रभू यांनी अपोलो हॉस्पिटलसोबत बोलणी केली. ते रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेच्या सीएसआर निधीतून सेंट लुक्‍स सुरू करण्यासाठी चाचपणी केली गेली; पण यश आले नाही. भारतीय जनता पक्षाच्यावतीने धर्मदाय आयुक्त कार्यालयात वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि शरद चव्हाण यांनी संस्थेविरोधात हॉस्पिटल सुरू करावे यासाठी अपिल दाखल केले होते. त्यावेळी आयुक्तांनी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी संस्थेला एका वर्षाची मुदत दिलेली आहे. 

नवी आशा 
अलीकडे तर कोरोना राष्ट्रीय आपत्ती काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन हे हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाने अधिग्रहित करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. पालकमंत्र्यांनी तातडीने सेंट लुक्‍स हॉस्पिटलला सर्व अधिकाऱ्यांसह भेट देत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी केली आणि तातडीने आठवड्याभरात किमान ओपीडी तरी सुरू करा, अशा सूचना दिल्या आहेत. संस्थेकडून आवश्‍यक निर्णय न झाल्यास महाराष्ट्र दिनी सेंट लुक्‍स हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले होते. सद्यस्थितीला सुस्त प्रशासकीय कारभार जबाबदार असल्याचे दिसत आहे. वेंगुर्लेतील सामाजिक संस्था, संघटना यांनी या प्रश्‍नी सातत्याने लोकप्रतिनिधी, आमदार, पालकमंत्री यांच्यामार्फत पाठपुरावा चालू ठेवण्याची गरज आहे. आरोग्य हा शासनाचा प्राधान्यक्रम लोकप्रतिनिधी विसरल्याचे त्यांच्या कृतीतून दिसत असले तरी सर्वसामान्य जनता त्यांना त्यांची आठवण करून देऊ शकते. 

आश्‍वासन कधी पूर्ण? 
पालकमंत्री सामंत यांनी सेंट लुक्‍स हॉस्पिटल त्वरित चालू व्हावे, म्हणून या हॉस्पिटलच्या कोल्हापूर व मुंबईतील व्यवस्थापनासोबत मेमध्ये चर्चा केली होती. यावेळी हे हॉस्पिटल त्वरित चालू केले नाही तर हॉस्पिटल आणि हॉस्पिटलची जागा राज्य शासन ताब्यात घेईल, असा इशारा हॉस्पिटल व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेला दिला होता. त्यावेळी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने सेंट लुक्‍स हॉस्पिटल त्वरित सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिलेल्या आश्‍वासनानुसार आता त्यांनी हॉस्पिटलच्या इमारतीची दुरुस्ती, रंगकाम सुरू केले. इमारतीच्या आजूबाजूच्या परिसराची साफसफाईही करण्यात आली; मात्र आता सर्व प्रक्रिया थांबली आहे. पालकमंत्र्यांचे आश्‍वासन कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा आहे. 

सेंट लुक्‍स प्रशासनाच्या संपर्कात आहे. हे हॉस्पिटल सुरू करण्यास प्रशासन तयार आहे; मात्र हॉस्पिटलबाबत प्रशासनाच्या न्यायालयीन बाबी असल्यामुळे त्यांची काही कामे अडकली आहेत. सेंट लुक्‍स हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील असून जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. 
- उदय सामंत, पालकमंत्री. 

हे हॉस्पिटल मार्च 2021 पर्यंत सुरू करण्याचे आदेश कोर्टाने संस्थेला दिले आहेत; मात्र 6 महिन्यांत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉक्‍टर उपलब्ध न झाल्याने या ठिकाणी ओपीडी सुरू करता आलेली नाही. कोल्हापूर येथील डॉ. प्रशांत जमणे यांच्याकडे हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी देण्याबाबत चर्चा झाली आहे. संस्थेमार्फत त्यांच्याकडून प्रस्ताव मागवला आहे. प्रस्ताव आल्यानंतर हॉस्पिटल सुरू होईल. 
- संतोष अर्वाटगी, संस्था पदाधिकारी, सेंट लुक्‍स हॉस्पिटल. 

हॉस्पिटलबाबत संबंधित संस्थेसोबत बैठक झाली आहे. 10 दिवसांपूर्वी हॉस्पिटलच्या जागेची पाहणी केली. हॉस्पिटल 100 टक्के सुरू करण्याचा मानस आहे. संस्थेचे मुख्य बिशप यांच्याशी 15 दिवसांत चर्चा होणार आहे. प्रस्ताव सादर करून व तांत्रिक बाबी पूर्ण करून नोव्हेंबरपर्यंत ओपीडी व 10 खाटांच्या आयपीडीची दुरुस्ती करण्यात येईल. टप्प्याटप्प्याने इतर सुविधा सुरू करू. 
- डॉ. प्रशांत जमणे, कोल्हापूर. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com