नरेंद्र डोंगराचे रूप पालटले

नरेंद्र डोंगराचे रूप पालटले

सावंतवाडी - दारूचा अड्डा बनलेल्या नरेंद्र डोंगराचे रूप पालटले आहे. सकाळ माध्यम समूहाने ‘नरेंद्र’च्या स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या मोहिमेमुळे आणि त्याची दखल  घेऊन वन विभागाने उभ्या केलेल्या यंत्रणेमुळे गेल्या दोन महिन्यांत नरेंद्राचे पावित्र्य पूर्वपदावर आले आहे. 

नरेंद्र डोंगर सावंतवाडी शहराची ओळख आहे. याला पर्यावरणाबरोबरच ऐतिहासिक महत्त्वही आहे. येथील जैवविविधता समृद्ध आहे; मात्र साधारण दोन महिन्यांपूर्वी हा डोंगर म्हणजे दारूचा अड्डा बनला होता. कोणाचेच नियंत्रण नसल्याने दिवसाढवळ्याही येथे मद्यपींचा अड्डा बसायचा. प्लास्टिक, दारूच्या बाटल्यांचा याचा ठिकठिकाणी खच पडला होता.

याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने दिले. यावरच न थांबता ‘सकाळ’ने नरेंद्राला कचरामुक्त करण्यासाठीची मोहीमच हाती घेतली. विविध सामाजिक संस्थांना यात सहभागाचे आवाहन करण्यात आले. सावंतवाडी पालिका, वाइल्ड कोकण यासह विविध सामाजिक संस्थांनी याला साथ दिली. यातून १२ फेब्रुवारीला नरेंद्रावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत विविध सेवाभावी, सामाजिक संस्था, मंडळे, पालिका, पोलिस व वन विभागाच्या साहाय्याने शेकडो टन कचरा जमा करण्यात आला. याला वन विभागानेही साथ दिली. नगराध्यक्ष बबन साळगावकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही यात सहभागी होऊन ‘सकाळ’च्या मोहिमेचे कौतुक केले. यावरच न थांबता ‘सकाळ’ने असा कचरा येऊच नये यासाठी पाठपुरावा केला. याला सावंतवाडी वन विभागाने समर्थ साथ दिली. सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक आणि तत्कालीन उपवनसंरक्षक रमेशकुमार यांनी नरेंद्र डोंगरावर स्वच्छता राहावी म्हणून विशेष योजना आखली.  

‘सकाळ’ने खऱ्या अर्थाने याला वाचा फोडल्यामुळे वन विभागाने नरेंद्राच्या पायथ्याशी असलेल्या गेटकडे तपासणी करण्यासाठी कायमस्वरूपी वनपालाची नियुक्ती केली. गार्डनकडे जाणाऱ्या प्रत्येकाकडे असलेल्या वस्तूची तपासणी करण्याचे व प्लास्टिकच्या वस्तू न नेण्यासाठी सूचना देण्यात येते. तसे असल्यास प्लास्टिक परत नेण्यास सांगण्यात येते. गार्डनमध्ये ठेवण्यात आलेल्या वनमजुरांना तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे नाव, गाव याची नोंदणी करण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली. नरेंद्रावर जाणाऱ्या रस्त्याच्या डागडुजीसाठीही हालचाली सुरू झाल्या. यासाठीची खडी टाकण्यात आली आहे. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर नरेंद्र डोंगराच्या पर्यटनाच्या विकासाकडे प्रशासनानेही आता पुढाकर घेतला आहे. डोंगराच्या गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकाला व स्थानिक नागरिकांना वरून विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी वन विभागाकडून निरीक्षण मनोरा बांधण्यात आला आहे.

या सगळ्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी मोहिमेनंतर दोन महिन्यांनी नरेंद्र डोंगराची पाहणी केली असता पूर्वीचे रूप पालटल्याचे ठळकपणे दिसते. पूर्वी येथे दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, पत्रावळी, ठिकठिकाणी जेवण बनविण्यासाठी लावलेल्या चुली दिसायच्या. आता या सगळ्या ठिकाणी स्वच्छता आहे. कधीही गेला तरी हवेत धूर उडविणारे तरुण दृष्टीस पडायचे. तेही चित्र नाहीसे झाले आहे. नरेंद्रावर चालण्यासाठी व व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही आता सुरक्षित वाटत आहे. वन विभागाने जरी सकारात्मक हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र स्वच्छता मोहिमेनंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नरेंद्र डोंगराच्या विकासासाठी केलेल्या घोषणा सत्यात उतरतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या ठिकाणी माझी नियुक्ती होऊन जवळपास दोन महिने झाली. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत आपण येथे असतो, मात्र एकही दिवस आपल्याला पालिकेचा कर्मचारी अथवा पोलिस कर्मचारी दृष्टिक्षेपात पडला नाही.
- जनार्दन गावडे, वनपाल

पोलिसांची गस्त
‘सकाळ’ने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेवेळी गृह राज्यमंत्री केसरकर यांनी पोलिसांना नरेंद्रावर गस्त घालण्याचे आदेश दिले होते. यानंतर येथील पोलिसांनी सकाळी आणि संध्याकाळी गस्त सुरू केली आहे. याचाही नरेंद्र स्वच्छ ठेवण्यासाठी उपयोग होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com