esakal | कोकणात जाखडीचे सूरही हरवले ; वाद्यांची विक्री फक्त २० टक्‍केच
sakal

बोलून बातमी शोधा

the sale of instruments in kokan decreased compared to last year due to corona

जाखडी, भजने म्हणणाऱ्या कलाकारांचाही रोजगार बुडाला आहे.

कोकणात जाखडीचे सूरही हरवले ; वाद्यांची विक्री फक्त २० टक्‍केच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणा धाव रे...गणा पाव रे... तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे... अशी गीते कोकणातील गणेशोत्सवाची शान आहेत. यंदा कोविडच्या महामारीने ढोल, ताशांसह जाखडीचे सूर हरवले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांसह मिरवणुकीला बंदी असल्यामुळे टाळ, मृदंग व ढोलकी विक्रेत्यांना यंदा लाखोंचा फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टक्‍केच व्यवसाय झाला असून जाखडी, भजने म्हणणाऱ्या कलाकारांचाही रोजगार बुडाला आहे.

हेही वाचा - तीन हजार किलोमिटरचे रस्ते; देखभालीचा प्रश्‍न गंभीर, कुठली ही स्थिती? 

गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. विविध अटी-शर्तींमध्ये उत्सव साजरा केला जात आहे; पण गणेशभक्‍तांचा उत्साह दांडगा आहे. मिरवणुका, घरोघरी जाऊन आरत्या करण्यावर बंधने आणली गेली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात होणाऱ्या विविध वाद्यांच्या विक्रीला फटका बसला आहे. त्यामुळे ढोलकी, मृदंग व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. घरगुती आरत्या होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील भक्‍तगण तबला, मृदंगाला शाई लावणे, त्यांची दुरुस्ती करणे यावरच भर देत आहेत. नव्याने साहित्य घेण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे खरेदीवर मोठा परिणाम होत आहे. मिरवणुकांना बंदी घातल्याने ढोल, ताशांची विक्रीही अवघी वीस टक्‍केच झाल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.

सर्व नियम पाळून भजनाची परवानगी द्या

भजनाबरोबरच जाखडीचे (नाच) स्वरही घुमणार नाहीत. कोकणात शक्ती-तुरा या नाचाचे जंगी सामने होणार नसल्याने रसिकांची मने हिरमुसली आहेत. हे सामने बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दीही असते. जाखडी नृत्याची बिदागी तेवढीच मोठी असते. यातून कलाकारांना रोजगारही मिळतो. यंदा गर्दी जमवणारे कार्यक्रम करता येणार नसल्याने या कलाकारांचा रोजगार बुडाला आहे. शासनाने याबाबत धोरण निश्‍चित करावे, यासाठी भजन मंडळांनी सर्व नियम पाळून भजन करण्याची परवानगी मिळावी, असे निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

हेही वाचा -  दिलासादायी! डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या पाचशेच्यावर, कोणता हा जिल्हा?

"कोरोनामुळे मिरवणुकीसह गर्दी होणारे कार्यक्रम करू नयेत, असे शासनाचे आदेश आहेत. कोरोनामुळे सामान्यांचे आर्थिक बजेटही कोलमडले आहे. त्याचा परिणाम खरेदीवर झाला असून ढोल, ताशे, मृदंग खरेदीचे प्रमाण यंदा मोठ्या प्रमाणात घटले आहे. आरतीसाठी घरगुती ढोलकीला मागणी आहे." 

- अरविंद मालाडकर, व्यावसायिक

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top