संभाजी भिडेंची बैठक चिपळूणात रोखण्याचा प्रयत्न 

संभाजी भिडेंची बैठक चिपळूणात रोखण्याचा प्रयत्न 

चिपळूण -शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांची बैठक रोखण्यासाठी आंबेडकरी चळवळीसह येथील विविध 13 संघटनांनी जोरदार विरोध केला. आंदोलनकर्त्यांनी भिडेंच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यात महिलाही आघाडीवर होत्या. या प्रचंड विरोधामुळे पोलिस बंदोबस्तात झालेली बैठक आणि आक्रमक आंदोलकांमुळे चिपळुणात 6 तासांहून अधिक काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, बॅरिकेटस तोडून बैठकीच्या ठिकाणी धाव घेण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिसांनी मोडून काढला. 

शहरातील चितळे मंगल कार्यालयात आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने भिडे गुरुजींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. याला आंबेडकरी चळवळीसह विविध 13 संघटनांनी विरोध दर्शवला होता. यामुळे सकाळपासूनच शहरातील चौकाचौकात पोलिस बंदोबस्त होता. संघटनांचे पदाधिकारी दुपारपासून इंदिरा सांस्कृतिक केंद्राजवळ ठाण मांडून होते. कार्यालयाजवळ देखील मोठा पोलिस बंदोबस्त होता. दुपारी साडेचारपासून आंदोलकांनी भिडेंच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू केली.

भिडे एसटीने येणार असल्याने चिपळूण आगारातही पोलिस बंदोबस्त होता. भिडेंच्या येण्याबाबत गुप्तता पाळली जात होती. गोवळकोट येथील कार्यकर्त्यांच्या घरात चर्चा झाल्यानंतर पोलिसांसमवेत भिडे बैठकीच्या ठिकाणी पोचले. दुपारी साडेतीनपासून जमा झालेले आंदोलक रात्रीपर्यंत ठाण मांडून होते. 

मंगल कार्यालयाकडे येणाऱ्या सर्व मागावर वाहतूक बंद केली होती. जुना भैरी मंदिराजवळील आंदोलनकर्ते पोलिसांचा बचाव भेदून नव्या भैरी मंदिरापर्यंत पोहोचले. त्यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी अटकाव करूनही आंदोलक थांबले नाहीत. त्यांनी अपर पोलिस अधीक्षक घट्टे यांच्याकडे बैठक रद्द करण्याची तसेच भिडेंना अटकेची मागणी आंदोलकांनी लावून धरली. भिडेविरोधी घोषणांनी तणाव वाढला. मितेश घट्टे यांनी बैठकीत जाऊन तब्बल दोनदा भिडेंशी चर्चा करून बैठक आटोपती घेण्याची विनंती केली. श्री. घट्टे, तहसीलदार जीवन देसाई आंदोलकांना वारंवार शांत राहण्याचे आवाहन करीत होते. दरम्यान, एक कार्यकर्ता जवळच असलेल्या अपार्टमेंटवरील टेरेसवर पोहोचला. आरडाओरडा झाल्यावर पोलिसांनी त्याला खाली आणले. 

विविध संघटनांचा सहभाग 
आंदोलनात संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, हित संरक्षक समिती, सम्यक विद्यार्थी, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, राष्ट्र सेवा दल, कोकण सिरत कमिटी, जमियत उलेमा अलहिंद, कुणबी सेना, बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा, मराठा सेवा संघ आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होते. 

बंदोबस्तात बाहेर हलवले 
सायंकाळी 6 च्या सुमारास सुरू झालेली बैठक रात्री 9 नंतर संपली. त्यावेळी बाहेर असलेल्या आंदोलकांनी संभाजी भिडेंना बाहेर पडण्यास अटकाव केला. त्यामुळे पोलिसांनी मोटार आत नेऊन त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. 

संभाजी भिडेंनी समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी चिपळुणातील विविध 13 संघटनांनी त्यांच्या बैठकीस विरोध केला होता. 
- सुभाष जाधव,
भारिप बहुजन महासंघ, चिपळूण 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com