कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम सुरू

बुधवार, 15 मे 2019

संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही लवकर पूर्ण होईल. स्मारक होण्यासाठी पालकमंत्रीही आग्रही होते. त्यासाठी नियोजनमधील निधीही उपलब्ध करून दिला असून ते लवकरच पूर्ण होईल.   - सुनील चव्हाण

रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या नकाशावर नेऊया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. 

कसबा ग्रामपंचायत येथे आज संभाजी महाराज यांच्या ३६२ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संगमेश्‍वरचे तहसीलदार संदीप कदम, दिलीप जगताप, संभाजी दहातोंडे, नरेश मोरे, संतोष धनावडे, राजेंद्र महाडिक, कसबा गावचे सरपंच अनंत शिगवण आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, कसबा हे पुरातन इतिहास असलेले गाव आहे. ३०० ते ३५० मंदिरे असली तरी त्यातील काही मंदिरे जीर्ण अवस्थेत आहेत. या मंदिरांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही लवकर पूर्ण होईल. स्मारक होण्यासाठी पालकमंत्रीही आग्रही होते. त्यासाठी नियोजनमधील निधीही उपलब्ध करून दिला असून ते लवकरच पूर्ण होईल.  मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यामुळे येथे दळवळणाचे चांगले साधन निर्माण होऊन पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. पर्यटनामध्ये वाढ झाल्याने येथे रोजगार वाढून विकास होईल. या सर्वमुळे कसबा गाव पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर नेऊ, यासाठी येथील ग्रामस्थांचे सहकार्य आवश्‍यक आहे. प्रशासनाकडून आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.