पहिले स्मारक अपूर्ण; नव्याच्या हालचाली

संदेश सप्रे
शुक्रवार, 5 मे 2017

कसब्यातील संभाजीप्रेमींचा विरोध - ६७ लाखांचा खर्च, बांधलेले स्मारक प्रत्यक्षात आणण्याची मागणी

कसब्यातील संभाजीप्रेमींचा विरोध - ६७ लाखांचा खर्च, बांधलेले स्मारक प्रत्यक्षात आणण्याची मागणी

देवरूख - तब्बल ६७ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या संभाजी स्मारकाच्या इमारतीला झाडाझुडपांनी वेढले असताना जिल्हा प्रशासनाकडून कसबा येथे नव्या स्मारकाच्या उभारणीची हालचाल गतिमान झाली आहे. पहिल्यांदा बांधलेले स्मारक प्रत्यक्षात आणा, मग गरज असेल तरच नव्या स्मारकाच्या बांधणीचा प्लॅन तयार करा, अशी मागणी संगमेश्‍वरातील संभाजीप्रेमींनी केली आहे. पहिले स्मारक पूर्णत्वास जाण्याआधी नव्या स्मारकाची उभारणी सुरू झाल्यास त्याला संभाजीप्रेमी कडाडून विरोध करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

संगमेश्‍वरची ग्रामदेवता जाखमाता मंदिराआधीच ११ मार्च १९८९ रोजी संभाजी राजांचे स्मारक उभारण्यास सुरवात झाली. गेल्या २९ वर्षांत या स्मारकाच्या इमारतीसाठी तब्बल ६७ लाख रुपये खर्ची पडले आहेत, तरीही ते अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. तरीही कसबा येथील ज्या सरदेसाईंच्या वाड्यात धर्मवीर शंभू राजांना दगाबाजीने जेरबंद करण्यात आले. ज्या वाड्यात राजांनी आपल्या आयुष्यातील शेवटचे न्यायनिवाडे केले, त्याच वाड्यात नवीन स्मारक उभारण्याचा घाट घातला जात आहे. नवे स्मारक उभारणीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका समितीने नुकतीच सरदेसाईंचा वाडा व परिसराची पाहणी करून नवे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी केली. यासाठी नियोजन अधिकाऱ्यांची एक समितीही गठीत करण्यात आली आहे. यामध्ये तहसीलदार, पोलिस निरीक्षक, बांधकाम खात्याचे अधिकारी, तलाठी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ही समिती आठवड्यात अहवाल प्रशासनाला देणार आहे; मात्र पहिल्यांदा सर्वसंमतीने जिथे स्मारक उभारण्यात आले आहे त्याचे काय, असा प्रश्‍न संभाजीप्रेमी नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

तिसऱ्या स्मारकाची गरज काय?
एकीकडे पहिले स्मारक अपूर्ण असताना दुसरीकडे नव्या स्मारकाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. १९८९ ला पहिल्या स्मारकाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर कसब्यातच संभाजी राजांच्या आठवणी राहाव्यात यासाठी स्थानिकांनी पैसे जमा करून १९९३ ला लेंडी येथे धर्मवीर शंभू राजांचा अर्धपुतळा उभारून त्यांच्या आठवणी जागृत करण्यात आल्या. या अर्धपुतळ्यावर जिल्हा नियोजनमधून लाखो रुपये खर्च करून मेघडंबरी उभारण्याचे काम सुरू आहे. आधीच दोन स्मारके असताना तिसरे स्मारक कशासाठी, असा सवाल नागरिक करीत आहेत.

पहिल्यांदा बांधलेले स्मारक अपूर्ण असताना नव्या स्मारकाचा घाट कशासाठी? या स्मारक इमारतीची तीन वेळा विटंबना झाली, त्यानंतरही त्याच्या पूर्णतेच्या कोणत्याही हालचाली नाहीत. आधी बांधलेले स्मारक पूर्ण करा, नंतरच नव्या स्मारकाची तयारी करा, अन्यथा संभाजीप्रेमी नव्या स्मारकाला विरोध करतील.
- पर्शराम पवार, संभाजी ब्रिगेड, संगमेश्‍वर

पहिल्या स्मारकाचे काय करणार ?

देवरूख - लाखो रुपये खर्चूनही गेली २९ वर्षे जे स्मारक अपूर्ण आहे, ते संभाजी स्मारक पूर्ण करण्याऐवजी नवीन स्मारक उभारणे म्हणजे संभाजी राजांच्या नावे केवळ निधी खर्च करण्याचे राजकारण करण्यासारखे आहे. आधी प्रशासनाने पूर्वीच्या स्मारकाचे काय करणार ते जाहीर करावे, नंतरच नवीन स्मारकाच्या उभारणीबाबत बोलावे, अशी मागणी कसबा येथील सरदेसाई वाड्याचे मालक सुभाष सरदेसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शासनाने कसबा येथे संभाजी राजांचे स्मारक व्हावे, यासाठी समिती नियुक्‍त केली आहे. त्या समितीने प्रथम संगमेश्‍वरातील स्मारकाचे बघावे नंतर कसब्यात यावे. कसबा येथे १९९३ ला संभाजी राजांची अर्धप्रतिमा उभारण्यात आली आहे. त्याचे सुशोभीकरण करून त्याचे यापूर्वीच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. परिणामी पहिली दोन स्मारके असताना शासनाने कोणत्याही संघटनेच्या सांगण्यावरून तिसऱ्या स्मारकाचा घाट घालणे थांबवावे, अशी मागणी केली आहे. 

सरदेसाई यांची जागा घेऊन टाकायची व जो निधी येईल त्यावर ठेकेदारांनी हात मारायचा व वेळकाढू धोरणाने स्मारकाची जागा संपादित करून पाडून ठेवायची. सरकार बदलले की विषय संपला. पूर्वी याच सरकारने हिंदू-मुस्लिम एकत्र राहतात म्हणून कसब्यात स्मारक नको, अशी भूमिका घेतली होती. आता त्याचे काय होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
संगमेश्‍वरातील स्मारक अजूनही पूर्ण नाही. स्मारक म्हणून जी इमारत उभी आहे, त्याचा वापर आडोसा म्हणून प्रेमी युगुले करतात. अनेकदा स्मारकाच्या इमारतीचे दरवाजे तोडले गेले. काचा फोडल्या गेल्या. येथील फलकाला चपलेचा हार घालण्याइतपत समाजकंटकांची मजल गेली. या साऱ्या नोंदी संगमेश्‍वर पोलिस ठाण्यात नोंद असतानाही त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने नव्या स्मारकासाठी जी समिती नेमली ती कोणाच्या सांगण्यावरून? नव्या स्मारकाची मागणी कोणत्या संघटनांनी केली? नवे भव्य दिव्य स्मारक म्हणजे नक्‍की काय? आदी गोष्टींचा सविस्तर खुलासा करण्याची मागणी सरदेसाई यांनी या निवेदनातून केली आहे.

Web Title: sambhaji mahgaraj monument