फुलपाखराच्या प्रजातींवर रत्नागिरीतही संकट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

फुलपाखरांच्या सुमारे 1500 भारतात आढळतात. महाराष्ट्रात 225 प्रकारची व ठाण्यात 40 ते 50 प्रकारची फुलपाखरे दिसतात. रत्नागिरीतही असा अभ्यास झाला पाहिजे. फुलपाखरू संवर्धनासाठी नागरिकांनी पुढे येऊन खारीचा वाटा उचलला पाहिजे.

रत्नागिरी - विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होते. त्यामुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतो. फुलपाखरे सोंगाडी असतात, शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या करतात हे मी पाहिल्यावर अभ्यास सुरू केला. काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ठाण्याप्रमाणेच रत्नागिरीतही ही स्थिती येऊ शकते, असा धोक्याचा इशारा ठाणे शहरी जैवविविधता ग्रुपचे प्रमुख समीर गुळवणे यांनी दिला.

हॉटेल कार्निव्हल येथे आयोजित कार्यक्रमात गुळवणे म्हणाले, फुलपाखरे ही वनस्पतीसह रसायनतज्ञ व सशक्त पर्यावरणाचे घटक आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन झालेच पाहिजे. यासाठी आपण राहतो तेथेच फुलपाखरांसाठी आवश्यक झाडे लावणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

आसमंततर्फे एमआयडीसीतील वनस्पती उद्यानात होणार्‍या फुलपाखरू उद्यानाने याला गती मिळेलच. पण नागरिकांनी यासाठी योगदान दिले पाहिजे. मुंबई, ठाण्यात आढळणारी काही फुलपाखरे आता दिसत नाहीत. अशी स्थिती रत्नागिरीवरही येऊ शकते. फक्त नियम करून उपयोग नाही तर त्यासाठी जागरुक नागरिकांचे अभियान राबवायला हवे.  ठाण्यात विविध सोसायट्यांना भेटून फुलपाखरांसाठी कढीपत्ता, लिंबू, बेल आणि फुलझाडे लावण्याचे आवाहन केले. जैवविविधता ग्रुपतर्फे निसर्ग संवर्धनाचे काम सुरू आहे.

- समीर गुळवणे 

श्री. गुळवणे म्हणाले,  फुलपाखरांच्या सुमारे 1500 भारतात आढळतात. महाराष्ट्रात 225 प्रकारची व ठाण्यात 40 ते 50 प्रकारची फुलपाखरे दिसतात. रत्नागिरीतही असा अभ्यास झाला पाहिजे. फुलपाखरू संवर्धनासाठी नागरिकांनी पुढे येऊन खारीचा वाटा उचलला पाहिजे. आसमंतने निसर्गविषयक कार्टून स्पर्धा घ्यावी. लहान मुलांमध्ये निसर्गविषयक जाणीव जागृती केली पाहिजे. 1935 मध्ये फुलपाखरू उद्यान करण्यात आले होते. त्यानंतर खूप अभ्यास करण्यात आला. फुलपाखराच्या जीवनचक्राच्या अंडी, सुरवंट, पुपा व फुलपाखरू या चार अवस्था आहेत. परागकण वाहून नेण्यास फुलपाखरांची मदत होते. फुलपाखरू संवर्धनासाठी आवश्यक झाडे कोणती, रंगीबेरंगी व मनाला आनंद देतात. मेक्सीकोमधील फुलपाखरे कॅनडात चार हजार किमीचा प्रवास करून जातात. यात त्यांच्या तीन पिढ्या होतात, अशी विस्मयकारक माहिती गुळवणे यांनी दिली.

या वेळी आसमंतचे प्रमुख व उद्योजक नंदकुमार पटवर्धन यांनी वनस्पती उद्यान व नव्याने होणार्‍या फुलपाखरू उद्यानाची माहिती दिली. उद्योजक कौस्तुभ सावंत यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

पाणथळ जागाही धोक्यात
शहरात इमारती बांधण्यास जागा नाहीत. त्यामुळे पाणथळ जागांवर भराव टाकून पशुपक्षी व फुलपाखरांच्या अधिवासाच्या जागासुद्धा नाहिशा झाल्या आहेत. पर्यावरणाच्या बाबतीत आपण गंभीर राहिलो नाही तर त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागणार आहे. त्यामुळे सूज्ञ नागरिकांनी संवर्धनासाठी पुढे यावे, असे गुळवणे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samir Gulavane comment