कणकवली ‘कचरा केंद्र’ होणार - पारकर

कणकवली ‘कचरा केंद्र’ होणार - पारकर

कणकवली - सांस्कृतिक, राजकीय घडामोंडींचे केंद्र, जिल्ह्याची आर्थिक राजधानी तसेच भालचंद्र महाराजांची पुण्यभूमी आणि अप्पासाहेब पटवर्धन यांची कर्मभूमी अशी कणकवली शहराची ओळख आहे. पण राणे कंपनीकडून ‘जिल्ह्याचे कचरा केंद्र’ अशी शहराची नवीन ओळख निर्माण केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही ९०० कोटींचा कचरा प्रकल्प नाही. त्यामुळे राणेंच्या इतर प्रकल्पांप्रमाणेच हा कचरा प्रकल्प देखील फसवा आहे, अशी टीका भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी केली.

येथील भाजप कार्यालयात श्री.पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासमवेत अतुल रावराणे, तालुकाध्यक्ष संदेश सावंत पटेल, गौरव हर्णे आदी उपस्थित होते. श्री. पारकर म्हणाले, ‘‘मुंबई, पुणे, औरंगाबाद तसेच राज्यातील मोठ्या महानगरांमध्ये कचऱ्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  तेथे ९०० कोटी रुपये खर्च करून हा कचरा प्रकल्प सुरू करणे व्यवहार्य ठरले असते. पण कणकवली सारख्या छोट्या शहरात हा कचरा प्रकल्प होतोय. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील कचरा कणकवलीत आणला जाणार आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘आमदार नीतेश राणे यांनी आजवर अनेक योजना आणल्या. औषध आपल्या दारी योजना सुरू केली. शहरात सीसीटीव्ही आणि मोफत वायफाय, गडनदीपात्रात रिव्हर राफ्टींग, रोजगार मेळावा, कुत्र्यांची नसबंदी आदी प्रकल्प आणले; मात्र ते काही दिवसांतच बंद पडले. त्याच धर्तीवरील हा कचरा प्रकल्प आहे.

...तर नागरिकांचे जगणे मुश्‍कील होणार
या प्रकल्पाच्या माध्यमातून कणकवलीकरांची फसवणूक केली जात आहे. जिल्ह्यातील कचरा इथे आला आणि त्यावर प्रक्रिया न झाल्यास शहर कचराकेंद्र म्हणूनच ओळखले जाणार आहे. परिणामी इथल्या नागरिकांचे जगणे मुश्‍कील होणार आहे. ’’ श्री. पारकर यांनी स्पष्ट केले. 

भाजपमुळेच राणेंना अच्छे दिन
नारायण राणे आपल्या समारोप यात्रेत ‘अच्छे दिन कुठे आहेत?’ असा प्रश्‍न विचारत आहेत. पण त्यांना भाजपमुळेच अच्छे दिन आले आहेत, हे ते सोयीस्करपणे विसरत आहेत. कुडाळ-मालवणची निवडणूक आणि मुंबईतील पोटनिवडणूक यात नारायण राणेंचा पराभव झाला. त्यानंतर त्यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात आले होते. ते अडगळीत पडले होते. परंतु त्यांना भाजप पक्षाने आपल्या कोट्यातून खासदारकी मिळवून दिलीय याचेही भान त्यांनी ठेवावे, असेही श्री.पारकर यांनी बोलून दाखवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com