संगमेश्‍वरात महामार्गावर खड्डे भरण्यास सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

देवरूख - गेले चार महिने बेसुमार खड्डयांमुळे चर्चेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्‍वर परिसरात आज खड्डे भरण्यास सुरवात झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्‍त केले आहे. 

देवरूख - गेले चार महिने बेसुमार खड्डयांमुळे चर्चेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्‍वर परिसरात आज खड्डे भरण्यास सुरवात झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्‍त केले आहे. 

आरवलीपासून बावनदीपर्यंतच्या 36 किमीच्या क्षेत्रात ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेला रस्ता धोकादायक झाला होता. गणेशोत्सवापूर्वी महामार्ग चकाचक करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिल्या होत्या; मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने महामार्ग विभागाची ही डागडुजी अपूर्ण राहिली होती. दरम्यानच्या काळात चौपदरीकरणाच्या अधिसूचना जारी झाल्या आणि रस्त्याचा ताबा संबंधित ठेकेदारांना देण्यात आला. परिणामी रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी त्या ठेकेदारांवर सोपविण्यात आली. ओझरखोलपासून पुढे ताबा असणाऱ्या एका ठेकेदाराने चेकडच्या साह्याने खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला; पण वाढलेल्या वाहतुकीत चेकडही निष्प्रभ ठरले. त्यानंतर आरवली ते संगमेश्‍वरचा भाग ताब्यात असलेल्या ठेकेदाराने महामार्गाच्या डागडुजीकडे दुर्लक्षच केले होते. यामुळे मार्गाची अवस्था आणखी बिकट झाली होती. मध्यंतरी सरसंघचालक मोहन भागवत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाणीजवारीने महामार्ग विभागाने तालुक्‍यातील मोठे खड्डे बुजविण्याचे औदार्य दाखवले; पण सर्वाधिक खराब भाग तसाच राहिल्याने हा राष्ट्रीय महामार्ग की खड्डे मार्ग असा प्रश्‍न निर्माण झाला होता. 

पावसाळा संपून तीन महिने होऊनही याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने गेले महिनाभर संगमेश्‍वरातील सर्वपक्षीय प्रतिनिधींनी महामार्ग विभागाला इशारे देत रस्ता दुरुस्त करा, नाहीतर रास्ता रोको करू असे बजावले होते. यानंतर गेल्या आठ दिवसांत बावनदीपासून पुढे खड्डे भरण्याच्या कामाला सुरवात झाली होती. 

कालपासून संगमेश्‍वर आणि परिसरात खड्डे भरणीचे काम वेगात सुरू आहे. आज माभळेसह सोनवी पूल, बसस्थानक तसेच इतर भागातील मोठे खड्डे असलेल्या भागांवर पॅच मारण्यात आले. परिणामी महामार्गावरील खड्डेयुक्‍त भागातील प्रवास आता बराचसा सुखकर झाला आहे.

Web Title: Sangamesvarata start to fill up potholes on the highway