संघर्ष यात्रा आज चिपळुणात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

सावर्डेत सभा - नेत्यांसह ४० आमदार होणार सहभागी

चिपळूण - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने राज्यात सुरू केलेली संघर्ष यात्रा बुधवारी चिपळुणात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह छोट्या पक्षाचे राज्यातील नेते, ४० आमदार या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत, मात्र काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या सहभागाबाबत अद्यापही अनिश्‍चितता आहे.

सावर्डेत सभा - नेत्यांसह ४० आमदार होणार सहभागी

चिपळूण - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने राज्यात सुरू केलेली संघर्ष यात्रा बुधवारी चिपळुणात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह छोट्या पक्षाचे राज्यातील नेते, ४० आमदार या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत, मात्र काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या सहभागाबाबत अद्यापही अनिश्‍चितता आहे.

युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. शेतकऱ्यांवर कर्ज झाल्यामुळे ते आत्महत्या करीत आहेत. त्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधी पक्षाकडून पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकार कर्जमाफी देत नसल्यामुळे सरकारविरोधात विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. त्याची सांगता कोकणात होणार आहे. रायगडमधून उद्या संघर्ष यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात येईल. सकाळी खेड भरणे नाका येथे आमदार संजय कदम, सरचिटणीस बाबाजी जाधव व काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते संघर्ष यात्रेचे स्वागत करतील. त्यानंतर बहादूरशेख नाका येथे चिपळुणातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संघर्ष यात्रेचे स्वागत करतील.

दुपारी २ वाजता सावर्डे येथील भाऊसाहेब महाडिक सभागृहात सभा होईल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही हजेरी असणार आहे.

रत्नागिरीत राणेंनी हजेरी लावली, तरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकांच्या संघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद मिळेल. १७ मे रोजी गणपतीपुळे येथे संघर्ष यात्रेचा मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे.

राणेंना विनंती
नारायण राणे यांच्या संघर्ष यात्रेतील सहभागाबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. राणे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यांच्या मागण्यांवर श्रेष्ठी कोणताही निर्णय घेत नसल्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मी संघर्ष यात्रेत सहभागी होणार नाही, असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी राणेंना फोन करून या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे.

Web Title: sangharsh yatra in chiplun