काँग्रेस कार्यकर्ते दक्षिणेत सक्रिय, उत्तरेत थंड

काँग्रेस कार्यकर्ते दक्षिणेत सक्रिय, उत्तरेत थंड

रत्नागिरी -  काँग्रेसला रामराम करून नारायण राणेंनी स्वतंत्र वाट चोखळण्याचा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केले; मात्र शिवसेना सोडल्यानंतर जे वातावरण होते, तसे काँग्रेस सोडल्यानंतर राहिले नसल्याचे जाणवत आहे. त्यातच उत्तर रत्नागिरीतील पाचही तालुक्‍यात राणेंची तेवढी ताकद नाही. राणे समर्थकांनी राजीनामा पवित्रा घेतल्यानंतर मूळ काँग्रेसवासीयांनीही त्यांना शह देण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे भविष्यात चिपळूण ते राजापूर या चार तालुक्‍यांतील काँग्रेसमधील वातावरण ढवळून निघणार आहे.

जिल्हा असो किंवा तालुका कार्यकारिणीवरील रिक्‍त पदांवर नियुक्‍त्याच झाल्या नसल्यामुळे तेथे समर्थकांची वर्णी लावणे शक्‍य झाले नव्हते. त्याचा फटका आता पक्षातून बाहेर पडल्यानंतर दिसू लागला आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा व राजापूरचा समावेश आहे. उत्तरेतील चिपळूण वगळता अन्य चार तालुक्‍यांत राणेंचा तेवढा प्रभाव नाही. रत्नागिरीतील तालुका उपाध्यक्षांसह युवक उपाध्यक्षांनी राजीनामे सादर केले; मात्र दापोली, गुहागर, खेड, मंडणगड या चार तालुक्‍यांमध्ये राणेंच्या राजीनाम्याचे पडसादच उमटलेले नाहीत. दक्षिणेतील चारही तालुक्‍यांतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर मूळ काँग्रेसवासीय जागे होऊ लागले आहेत. राजापुरात मूळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी उचल खाल्ली असून वरिष्ठ पातळीवरूनही त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

राजीनामा देणाऱ्या समर्थकांमध्ये बड्या नेतृत्वाचा अभाव दिसतो. जिल्हा परिषदेवर एकमेव पाचल येथील सदस्य काँग्रेसकडून निवडून गेला आहे. राजापुरात नगराध्यक्ष काँग्रेसचा आहे. नीलेश राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये राजापूर नगराध्यक्षांना निवडून आणण्यात राणेंचा महत्त्वाचा वाटा असल्याचे जाहीर केले होते. 

त्यामुळे ते दोघे कोणता निर्णय घेतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे. त्यांनी राणेंच्या पावलावर पाऊल टाकले, तर समर्थकांची बाजू भक्‍कम होणार आहे. अन्यथा राणेंच्या भविष्यातील वाटचालीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकणार आहे. रत्नागिरी तालुक्‍यातील राणेंच्या जुन्या समर्थकांची अनुपस्थितीही खटकणारी होती. राणेंची भविष्यातील वाटचाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. सद्यःस्थितीत राणे भाजपमध्ये गेले, तर त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज तिकडे जाईल. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते वाढतील. आधीच जिल्ह्यातील भाजप कमकुवत आहे. त्यांना थोडी उभारी मिळेल; पण राणेंनी स्वतंत्र पक्ष काढला, तर त्यांना ताकद निर्माण करणे ‘जड’ जाईल.

शिवसेनेतील फुटणाऱ्यांवर मदार
राणेंच्या निमित्ताने शिवसेना सोडून भाजपत जाणाऱ्यांवर नारायण राणेंची मदार राहणार आहे. रत्नागिरीतील काही नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचे समर्थकांनी जाहीर केले. ते नगरसेवक कोण याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांची मोट बांधली तर भाजपच्या पथ्‍यावर पडणार आहे.

निर्णयाची झळ उत्तर रत्नागिरीत कमी

दापोली -  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा देत नवीन घरोबा करण्याचे निश्‍चित केले असले, तरी त्यामुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याला फारशी झळ बसणार नाही. काँग्रेसचा त्याग करून राणे कोणत्याही पक्षात गेले तरी गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड या रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्‍यात मुळातच काँग्रेसची ताकद खूपच मर्यादित आहे.

या चार तालुक्‍यांचे विभाजन दोन विधानसभा मतदारसंघात झाले असून दोन्ही विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. नारायण राणे यांच्या भविष्यातील राजकीय प्रवासात या भागातून किरकोळ अपवाद वगळता अन्य काँग्रेसजन त्यांची कास धरण्याची शक्‍यता कमी आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची धुरा प्रदेश उपाध्यक्ष आमदार भाई जगताप सांभाळत आहेत. नारायण राणे आणि भाई जगताप यांच्यातील तीव्र मतभेद लक्षात घेता दापोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते भाई जगताप यांच्यासोबत राहण्याची शक्‍यता आहे.

गतवर्षीच्या नगरपंचायत निवडणुकीत भाई जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला मदत करीत नगरपंचायतीच्या सत्तेचा लाभ कार्यकर्त्यांना मिळवून दिला. तालुक्‍यातील काँग्रेसमध्ये जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा अधिक भरणा असल्याने काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्‍यता नाही. यापूर्वी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना नारायण राणे यांचा असलेला दबदबा सद्यस्थितीत जाणवत नाही. तरी इतर पक्षातील विशेषतः शिवसेनेतील नाराज नेत्यांना आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाण्याची शक्‍यता आहे. दापोली मतदारसंघात शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे नाराज कार्यकर्त्यांना ओढण्याचा प्रयत्न नारायण राणे यांच्या समर्थकांकडून करण्यात येईल, अशी चर्चा दापोलीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.   

दादा पक्षात असताना विकासकामांच्या निमित्ताने संपर्क होता; मात्र दापोली काँग्रेस ही निष्ठावान जुन्या कार्यकर्त्यांची असल्याने पक्षांतर करण्याचा प्रश्नच येत नाही.
- मधुकर दळवी, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com