कुडाळातील व्यावसायिक तिरोडकरांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

कुडाळ - येथील सॅमसंग कॅफेचे मालक शैलेश शाम तिरोडकर (वय ४६, रा. पिंगुळी सराफदारवाडी) हुबळी-राणेबेन्नूर येथे आज झालेल्या भीषण अपघातात ठार झाले. अन्य दोघे जखमी झाले. शृंगेरी मठात जाताना पहाटे साडेतीनला अपघात झाला.

कुडाळ - येथील सॅमसंग कॅफेचे मालक शैलेश शाम तिरोडकर (वय ४६, रा. पिंगुळी सराफदारवाडी) हुबळी-राणेबेन्नूर येथे आज झालेल्या भीषण अपघातात ठार झाले. अन्य दोघे जखमी झाले. शृंगेरी मठात जाताना पहाटे साडेतीनला अपघात झाला.

तिरोडकर मोटारीने काल (ता. २३) दुपारी तीन वाजता कुडाळहून शृंगेरी मठाकडे निघाले. समवेत स्वामींचे शिष्य दत्तानंद महाराज व राजू पुनाळेकर होते. बेळगाव येथे तिरोडकर यांचे मित्र अशोक प्रभू पुण्यावरून बेळगाव येथे आले. तेथून दोन गाड्या घेऊन ते एकत्र निघाले. श्री. प्रभू यांची गाडी पुढे तर तिरोडकर त्यांच्या मागे होते. तिरोडकर गाडी चालवित होते. श्री. प्रभू यांची गाडी बरीच पुढे आली. त्यांनी दूरध्वनी लावला तर त्यांना अपघात झाल्याचे समजले.

हुबळीपासून १२० किलोमीटर राणेबेन्नूर याठिकाणी उभ्या ट्रकवर त्यांची गाडी धडकली. मोटारीच्या दर्शनी भागाचा चक्‍काचूर झाला. गाडीच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या होत्या. श्री. तिरोडकर यांच्या डोक्‍याला व छातीला गंभीर दुखापत झाली होती. अशा अवस्थेत ते गाडीतून उतरून तिथे दाखल झालेल्या रुग्णवाहिकेपर्यंत चालले. रुग्णवाहिकेत बसल्यानंतर त्यांचे निधन झाले. गाडीतील अन्य दोघांना दुखापती झाल्या. पहाटे दरम्यान भीषण अपघात झाला. अपघातापूर्वी काही किलोमीटरवर ते चहा पिण्यासाठी थांबले होते.

श्री. तिरोडकर यांचे गोरेगाव (मुंबई) येथे वास्तव्य होते. त्यांनी २०१४ मध्ये नक्षत्र टॉवर येथे सॅमसंग मोबाईल शोरूम उघडली. जिल्ह्यात अन्यठिकाणीही त्यांनी व्यवसाय उभा केला होता. पिंगुळी सराफदारवाडी येथे ते राहायचे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी नावलौकिक मिळविला होता.

सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत मदतीच्या दृष्टीने त्यांचे योगदान होते. अनेक नाट्यसंस्थांना त्यांनी आर्थिक मदत केली होती. अपघाताची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते राजन नाईक, द्वारकानाथ घुर्ये, विजय तेंडोलकर, बाळा घुर्ये, ॲड. पी. डी. देसाई, ब्रिजेश कोठावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उद्या (ता. २५) अंत्यसंस्कार होतील.

दुकाने बंद ठेवून आदरांजली
अपघाताची बातमी समजताच नक्षत्र टॉवरमधील दुकाने आज बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सायंकाळपर्यंत त्यांच्या घरी अपघाताचे वृत्त देण्यात आले नव्हते.

Web Title: Sangli News Tirodkar death in an accident