Loksabha 2019 : राऊत यांच्या प्रचारात न उतरण्याचा संगमेश्वर भाजपचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मार्च 2019

देवरूख - जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन योग्य तो निर्णय देत नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारात जाहीरपणे न उतरण्याचा निर्णय संगमेश्‍वर तालुका भाजपच्या काल (बुधवारी) रात्री झालेल्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला.

देवरूख - जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन योग्य तो निर्णय देत नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारात जाहीरपणे न उतरण्याचा निर्णय संगमेश्‍वर तालुका भाजपच्या काल (बुधवारी) रात्री झालेल्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला.

संगमेश्‍वर तालुका भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. जिल्हाध्यक्ष बाळ माने, तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, शहराध्यक्ष सुधीर यशवंतराव, तालुका सरचिटणीस अमित केतकर, कुंदन कुलकर्णी, नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, माजी नगराध्यक्ष नीलेश भुरवणे यांच्यासह तालुक्‍यातील महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या. गेल्या पाच वर्षात शिवसेनेच्या खासदारांनी पक्षाचा, नेत्यांचा आणि स्थानिकांचा कसा अपमान केला याचा पाढा वाचण्यात आला.

जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी पक्षादेश मानावाच लागेल, असा आग्रह धरला मात्र उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला ठोस विरोध केला. आमच्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्री आमच्याशी स्वतंत्र बैठक घेऊन आमचे म्हणणे ऐकून घेत नाहीत तोपर्यंत कुणाचाही आदेश मानणार नाही, असे कार्यकर्त्यांनी ठणकावले. यामुळे ३१ मार्चला अर्ज भरतेवेळी संगमेश्‍वर तालुक्‍यातील भाजप कार्यकर्ते सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. 

सेनेसमोर पेच
मतदारसंघातील वादावर तोडगा काढण्यासाठी ४ एप्रिलला मुंबईत बैठक आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय जाहीर करण्याचे एकमुखाने ठरवण्यात आले. लोकसभा निवडणुकीचा फड तापला असताना भाजपची भूमिका अद्यापही ताठ असल्याने आता सेनेसमोरचा पेच वाढत निघाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangmeshwar BJP oppose to VInayak Raut