'तटकरेंवर दाखल केलेल्या हक्कभंगाला राष्ट्रवादी काँग्रेस घाबरत नाही'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

तुम्ही अशा पोकळ धमक्‍या द्यायच्या बंद करा, तुमच्या तक्रारीला केराची टोपलीच दाखवली जाईल

खेड (रत्नागिरी) : खासदार सुनील तटकरे यांच्यावर दाखल केलेल्या हक्कभंगाला राष्ट्रवादी काँग्रेस घाबरत नाही. तुमची तक्रार ही हक्कभंग होतच नाही. त्यामुळे तुम्ही अशा पोकळ धमक्‍या द्यायच्या बंद करा, तुमच्या तक्रारीला केराची टोपलीच दाखवली जाईल, असे संजय कदम यांनी आमदार योगेश कदम यांना सुनावले आहे. 

आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्राद्वारे खासदार सुनील तटकरे यांचे कान पकडण्याची सूचना केल्याने जिल्ह्यात या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत संजय कदम ‘सकाळ‘शी बोलताना ते म्हणाले, मी आमदार असताना योगेश यांचे वडील रामदास कदम हे राज्याचे पर्यावरणमंत्री होते. तेव्हा दापोली मतदारसंघात त्यांनी अनेक कामांची भूमिपूजने व उद्‌घाटने केली. त्या वेळी मला न बोलवताच कार्यक्रम केले जात होते.

हेही वाचा - अधिकारी आमदारांना भेटत नाहीत; शासनाची परिपत्रके काढून कारभार करतात -

योगेश कदम यांच्याकडे कोणतेच पद नव्हते. त्यांचे नाव भूमिपूजन व उद्‌घाटनाच्या नामफलकावर लिहिले जायचे. हे कोणत्या नियमात बसत होते? तेव्हा माझ्यावर अन्याय झाला नाही का? आणि मी रामदास कदम यांच्यावर कितीवेळा हक्कभंग दाखल करायला हवा होता. पण मी ते केले नाही, याची आठवण करून देतो. 

ही प्रणाली राष्ट्रवादीने आणल्याचा समज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने खेडमध्ये ड्युरा ऑक्‍सिजन प्रणाली बसवली. त्या उद्‌घाटन कार्यक्रमास रितसर निमंत्रण देऊनही ही प्रणाली राष्ट्रवादीने आणली, असा समज करून ते कार्यक्रमास आले नाहीत. खासदार तटकरे यांनी प्रयत्न केल्यामुळेच खेडला नेत्रावती एक्‍सप्रेसला थांबा मिळाला, असेही कदम यानी सुनावले.

सांत्वनपर भेट दिल्याचे दिसले नाही

आमदार कदम हे कोरोना काळात सुरवातीला दोन महिने मतदारसंघात फिरकलेच नव्हते. त्यावेळी एखादा रुग्ण गावात मिळाला तर संपूर्ण वाडी किंवा गाव १४ दिवसांसाठी कंन्टेन्मेंट झोन केले जात होते. पण जामगे गावात असे झाले नाही. या काळात अनेक रुग्णांचे निधन झाले. यांनी कोणालाही सांत्वनपर भेट दिल्याचे दिसले नाही. 

हेही वाचा - बापरे! तीन बिबटे चक्क अंगणात -

...त्या पद्धतीचा हा प्रस्ताव

पर्यावरणमंत्री असताना रामदास कदम यांनी, लोटे येथील अनेक कारखान्यांना उत्पादन बंदच्या नोटीस दिल्या होत्या आणि त्या लगेच मागे घेतल्या होत्या. त्या पद्धतीचा योगेश कदमांचा हक्कभंग प्रस्ताव आहे, असेही ते म्हणाले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay kadam criticized on yogesh kadam statement do not fear of rashtrawadi congress in ratnagiri