Sankeshwar-Banda highway issues
Sankeshwar-Banda highway issues

संकेश्‍वर-बांदा महामार्ग रेडीपर्यंत?

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  नव्याने होऊ घातलेला संकेश्‍वर-बांदा हा राष्ट्रीय महामार्ग आता जुन्या प्लाननुसारच म्हणजे रेडी बंदरापर्यंत नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत नव्याने केंद्राकडून सूचना देण्यात आल्याचे कोल्हापूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे; मात्र हा महामार्ग नेमका कसा असेल, चौपदरी की दुपदरी? याबाबत अद्याप साशंकता आहे. 

केंद्राकडून अलीकडेच एनएच 548 अशा नामकरणाने संकेश्‍वर ते बांदा या 108 किलोमीटर चौपदरीकरीण राष्ट्रीय महामार्गाला मान्यता दिली आहे; मात्र हा महामार्ग बावळाटमार्गे बांद्याला जोडणार की, सावंतवाडीमार्गे बांद्याला जोडणार, याबाबत तर्कवितर्क लढविले गेल्याने संभ्रम निर्माण झाला होता. बावळाटमार्गे बांद्याला हा महामार्ग जोडला गेल्यास सावंतवाडी शहराला याचा फायदा होणार नाही. त्यामुळे हा महामार्ग शहरातून जावा, यासाठी प्रसंगी आंदोलनाची भाषाही सावंतवाडीतील व्यापारी, उद्योजक वर्गाकडून केली जात होती.

मुळात जुन्या प्लाननुसार हा महामार्ग रेडी पोर्टला जोडला जाणार होता. अशा सुरवातीला हालचालीही झाल्या होत्या; मात्र कालांतराने या हालचाली थंडावल्या गेल्या. आता मात्र या महामार्गाच्या विस्तारीकरणाबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. मुळात पूर्वी हा मार्ग रेडी (ता. वेंगुर्ले) ते संकेश्‍वर असा होता. केंद्राने जुना हा प्लान रद्द करत नव्याने तो बांद्यापर्यंतच निश्‍चित केला होता. सुरवातीला जुन्या प्लाननुसार हा महामार्ग सावंतवाडी शहरातून प्रस्तावित असलेल्या रिंग रोडमार्गे इन्सुलीमार्गे मुंबई-गोवा महामार्गाला जोडावा, असा प्रस्ताव माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी शासनाकडे मांडला होता. त्यामुळे हा महामार्ग बांद्यामार्गे पुढे रेडी पोर्टपर्यंत जाणार होता; मात्र त्यानंतर याबाबत काहीच हालचाली झाल्या नव्हत्या.

नव्याने केंद्राकडून संकेश्‍वर ते बांदा या 108 किलोमीटर चौपदरीकरण महामार्गाला मान्यता देताना त्याचे एनएच 548 असे नामकरणही करण्यात आले होते; मात्र हा महामार्ग बावळाटमार्गे बांदा असा झाल्यास 10 किलोमीटरचे अंतर वाचणार होते. सावंतवाडीमार्गे गेल्यास 10 किलोमीटरचे अंतर वाढणार होते. शिवाय शहरामध्ये भूसंपादनासंदर्भात अडचणींचा सामनाही करावा लागणार होता. त्यामुळे महामार्ग बावळाटमार्गे नेण्याच्या हालचाली सुरू होत्या. यासाठी महामार्गाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सिंधुदुर्गात दाखल होत अलीकडे सर्व्हे करण्यात आला होता; मात्र आता बांदा-संकेश्‍वर या महामार्गाला लागून बांद्यापासून पुढे रेडी पोर्टपर्यंत हा महामार्ग नेण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. 

पुन्हा एकदा निर्णय 
याबाबत कोल्हापूर येथील महामार्ग विभागाच्या वरिष्ठ सूत्रांकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, अलीकडेच केंद्रात झालेल्या बैठकीमध्ये याबाबत पुन्हा एकदा निर्णय झाला आहे. तशा सूचनाही प्राप्त आहेत; मात्र हा मार्ग कसा असेल? त्यासंदर्भात काहीच अधिक माहिती आम्हाला नाही. राज्यातील चार महामार्गांपैकी सिंधुदुर्गातील रेडी पोर्टला जोडणाऱ्या संकेश्‍वर रेडी या महामार्गाचा समावेश आहे. 

सावंतवाडी की बावळाट? 
संकेश्‍वर ते बांदा हा महामार्ग बावळाटमार्गे बांद्याला जोडणार की, सावंतवाडीमार्गे बांद्याला जोडणार? यासंदर्भात अद्यापही शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे यासंदर्भातील संभ्रम अद्यापही कायम आहे. लवकरच यावर तोडगा निघेल, असे कोल्हापूर येथील राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com