सरपंचपदाचा हार पडणार कुणाच्या गळ्यात ? आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

कुठल्या ग्रामपंचायतीसाठी काय आरक्षण पडणार हे त्याच वेळी स्पष्ट होणार आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील नुकत्याच झालेल्या 11 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती बरोबरच इतर सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत 28 रोजी सकाळी 11 वाजता येथील बॅ. नाथ पै सभागृहामध्ये काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. 

निवडणूक झालेल्या 11 ग्रामपंचायतीमध्ये कोणते आरक्षण पडल्यास कोणाला संधी मिळू शकते याबाबत चाचपण्या सुरू झाल्या आहेत. इतर 52 ग्रामपंचायतींसाठी काय आरक्षण पडणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी बरोबरच दोन वर्षानंतर पुन्हा होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकातील ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्याची तारीख निश्‍चित केली आहे. 28 रोजी जिल्ह्यात तालुकानिहाय ही सोडत होणार आहे. 

हेही वाचा - रिफायनरीबाबत सकारात्मक भूमिका घेणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे

सावंतवाडी तालुक्‍यातील नुकत्याच निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींसह उर्वरित 52 ग्रामपंचायतींसाठीही येथील बॅ. नाथ पै सभागृहामध्ये आरक्षण सोडत निघणार आहे. ही सोडत चिठ्ठीद्वारे होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कुठल्या ग्रामपंचायतीसाठी काय आरक्षण पडणार हे त्याच वेळी स्पष्ट होणार आहे. सावंतवाडी तालुक्‍यातील 63 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण कोटाही निश्‍चित केला आहे. त्यामुळे आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

आत्ताच निवडणूक झालेल्या 11 ग्रामपंचायतीमधील सदस्य संख्या लक्षात घेता महिला सदस्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी महिला सरपंच बसण्याची शक्‍यता आहे. इतर ग्रामपंचायतींचा विचार करता बऱ्याच ग्रामपंचायतींवर गेली दोन टर्म महिला सरपंच आरक्षण पडल्याने पुन्हा याठिकाणी महिला आरक्षण नको, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

बऱ्याच ठिकाणी महिला सरपंच असल्या तरी ग्रामपंचायतींचा कारभार हा तिचा पती किंवा अन्य सदस्य चालवीत असल्याचे चित्र आहे. सरपंच म्हणून महिलाही स्वाक्षरी पुरती असते. याबाबत आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळतात. त्यामुळे ज्याठिकाणी महिला सरपंचपद जास्त वर्षे आहे, अशा ठिकाणी पुन्हा महिला आरक्षण नसावे, अशी मागणी केली जात आहे. 

हेही वाचा -  अखेर युवतींनी आरडाओरड केल्यावर दोघेही तेथून पळून गेले

 

फोडाफोडीचे राजकारण शक्‍य 

निवडणूक झालेल्या 11 ग्रामपंचायतींची स्थिती लक्षात घेता, काहींमध्ये सत्ता आलेल्या पॅनेलमध्ये ठराविक प्रवर्गातील सदस्य निवडून न आल्याने तेथे तेच आरक्षण पडल्यास सत्तापालट होण्याचीही शक्‍यता आहे. या सर्व शक्‍यता लक्षात घेता आत्तापासूनच सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. यातून फोडाफोडीचे राजकारण डोके वर काढणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडती नंतरच सावंतवाडी तालुक्‍यांमध्ये कोणाच्या वाट्याला किती ग्रामपंचायती, हे चित्र स्पष्ट होणार आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarpanch elected in sawantwadi from 28 january in sindhudurg