सरपंच निवडीत नेत्यांची कसोटी, फोडाफोडीचे राजकारण शक्य 

sarpanch selection sawantwadi taluka konkan sindhudurg
sarpanch selection sawantwadi taluka konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 11 ग्रामपंचायतींची सरपंच निवडणूक लवकरच होणार आहे. सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच कोण? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. सरपंचपदासाठी इच्छुकांनी डोके वर काढण्यास सुरवात केली असून नाराजीतून फोडाफोडीचे राजकारणही रंगणार आहे. त्यामुळेच सरपंच निवडीत गावनेत्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचीही कसोटी लागणार आहे. 

15 जानेवारीला झालेल्या तालुक्‍यातील 11 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे पदाचे आरक्षण 28 जानेवारीला निवडणूक निकालानंतर टाकण्यात आले. यापुर्वी सरपंच आरक्षण निवडणुकीआधी टाकण्यात येत होते; मात्र यावेळी ग्रामविकास मंत्र्यांकडून आरक्षण कार्यक्रमात बदल करत ते निकालानंतर टाकण्याच्या सुचना दिला. यामुळे सर्वच राजकीय पुढाऱ्यांचे गणित बिघडले होते. बऱ्याच वेळा आरक्षणाचा उमेदवार निवडून यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले जातात यासाठी हा निर्णय बदलला होता. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. आरक्षणानंतर अनेकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

काही ठिकाणी बंड केल्याने आपल्याच उमेदवाराचा पराभव होऊन सत्ता हातातून गेल्याचेही चित्र समोर आले. कमी जागा निवडून येऊनही जास्त जागा निवडून आलेल्याकडे आरक्षणाचा निवडून आलेला सदस्य नसल्याने आलेली सत्ता घालविण्याची पाळी आली आहे. सावंतवाडी तालुक्‍यात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सर्वसाधारण म्हणजेच खुल्या आरक्षणाच्या ठिकाणी अनेक चेहरे आता सरपंचपदासाठी पुढे सरसावत असल्याने कोणाला डावलायचे आणि कोणाला नाही? हा प्रश्‍न उभा राहणार असून इच्छुकांना शांत करण्यासह नाराजीतून फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे. त्यामुळेच कोणाला सरपंच करायचे? हा नवा पेचही गावपुढाऱ्यांसमोर उभा राहणार आहे. 

दांडेलीत तरुणांच्या हाती सत्ता 
दांडेलीत यंदा सत्तापरिवर्तन होत येथील ग्रामस्थांनी तरुणांच्या हाती सत्ता दिली आहे. राजकारणातील नवखे चेहरे याठिकाणी असल्याने कोणाकडे सत्तेची चावी द्यायची? हे तेथील नेतृत्वाला आव्हान असणार आहे. आंबोली, चौकुळ याठिकाणीही भाजपला यश आले आहे. खुले आरक्षण असल्याने येथे कोणाच्या गळ्यात सरपंचांची माळ पडते? हे पाहायला हवे. आंबोलीत शिवसेनेतून भाजपत आलेले दत्तु नार्वेकर व गजानन पालेकर हे दावेदार आहेत तर चौकुळमध्ये गुलाब गावडे दावेदार समजले जात आहेत. 

मळेवाड, मळगावची स्थिती अशी... 
मळेवाडमध्ये ओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने याठिकाणी हेमंत मराठे यांची संधी हुकली आहे. आता कोणाला संधी मिळते, याकडे पाहावे लागेल. मळगाव ग्रामपंचायतीत महिला सर्वसाधारण आरक्षण पडल्याने याठिकाणी सरपंच पदावरून नाराजी उद्‌भवू शकते. येथे सव्वा सव्वा वर्षासाठी फार्म्युला अवलंबविण्याची शक्‍यता आहे. 

तळवडेत मोठा पेच 
तळवडेत ओबीसी महिला सरपंच बसणार आहे. येथे भाजपचे पाच, शिवसेनेचे आठ सदस्य निवडून आले आहेत. महिला ओबीसीमधून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये शिवसेनेतील तिघांचा समावेश आहे. यापैकी कोणाला संधी द्यावी, असा प्रश्‍न शिवसेनेसमोर आहे. याठिकाणी भाजपही ताकदवान पक्ष असल्याने फोडाफोडी होण्याची भीती शिवसेनेला आहे. एकीला सरपंचपद दिल्यास दोघी नाराज होण्याची शक्‍यता आहे. हे दोघे भाजपमध्ये गेल्यास तिथे भाजपची सत्ता बसू शकते. त्यामुळे तळवडेत सरपंच बसण्यावरून पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

आरोंद्यात भाजप गोटात उत्साह 
आरोंदा ग्रामपंचायतसाठी ओबीसी महिला आरक्षण पडले आहे; मात्र या ठिकाणी सेनेचे 6 व भाजपचे 5 असे बलाबल असूनही या प्रवर्गातील महिला शिवसेनेकडे नसल्याने सेनेला येथे मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी ओबीसीमधून निवडून आलेल्या सुप्रिया पार्सेकर व गीतांजली वेळणेकर या दोन्ही महिला या भाजपाचा असल्यामुळेच भाजपच्या गोटात मात्र उत्साह संचारला आहे; मात्र सरपंच निवडणुकीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. 

कोलगावकडे साऱ्यांचे लक्ष 
सावंतवाडी तालुक्‍यात 11 ग्रामपंचायतींपैकी आंबोली, चौकुळ, कोलगाव, दांडेली, आरोस याठिणी खुले आरक्षण पडल्याने सरपंच पदासाठी याठिकाणी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. कोलगावसारख्या महत्वाच्या व मोठ्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. या ग्रामपंचायतीवर कोणाला सरपंच करायचे? हा प्रश्‍न महेश सारंग यांच्यासमोर आहे; मात्र आधीच याबाबत निर्णय झाल्यास नाराजी नसेल. याठिकाणी सारंग यांचे बंधु दिनेश सारंग, संदिप हळदणकर, संतोष राऊळ हे चेहरे सरपंच पदाचे दावेदार ओळखले जात आहेत; मात्र या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात माळ पडते? ही येणारी वेळ ठरविणार आहे. 

इन्सुलीत रंगणार राजकारण 
इन्सुलीत शिवसेना, भाजपमध्ये समान बलाबल आहे. स्वागत नाटेकर हे अपक्ष निवडून आले असून ते भाजपचे असल्याचा दावा भाजपचा आहे. भाजपकडून तात्या वेंगुर्लेकर, दत्ता खडपकर व स्वागत नाटेकर, असे तीन चेहरे आहेत तर शिवसेनेकडे विद्यमान सरपंच असलेल्या पूजा पेडणेकर व सोनाली मेस्त्री हे दोन चेहरे आहेत. याठिकाणी भाजप कोणाला संधी देतो? यावर राजकारण रंगणार आहे. तिघांची समजूत काढणे भाजपला कठीण जाण्याची शक्‍यता आहे. नाराजी झाल्यास शिवसेनेला एकाच जागेची आवश्‍यकता असल्याने याठिकाणी फोडाफोडीचे राजकारणही रंगू शकते. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com