राणे माझ्यावर अन्याय करणार नाहीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

सावंतवाडी - खासदार नारायण राणे यांच्याशी मी आजपर्यंत प्रामाणिक राहिलो आहे. त्यामुळे आता तरी माझ्यावर अन्याय होणार नाही, असा विश्‍वास जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे व्यक्त केला. 

सावंतवाडी - खासदार नारायण राणे यांच्याशी मी आजपर्यंत प्रामाणिक राहिलो आहे. त्यामुळे आता तरी माझ्यावर अन्याय होणार नाही, असा विश्‍वास जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे व्यक्त केला. 

मी विधानसभा लढवावी, अशी सगळ्यांची इच्छा आहे; मात्र राणे यांनी आशीर्वाद दिल्यास मला निश्‍चितच यश मिळेल, यात काही शंका नाही. विशेष म्हणजे सावंतवाडी विधानसभेतील लोकांसोबत तालुकाध्यक्ष संजू परबही माझ्या पाठिशी राहतील, असा विश्‍वासही सावंत यांनी व्यक्त केला. 

सावंत यांचे नाव सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून चर्चेत आहे. आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत छेडले असता त्यांनी हा दावा केला. 

ते म्हणाले ""आगामी काळात तब्बल 10 वर्षांनी जिल्ह्यात शिक्षक भरती होत आहे. यात सुमारे दीडशे पदांचा समावेश आहे; मात्र ही भरती प्रक्रिया यशस्वी करताना याठिकाणी स्थानिक उमेदवारांना संधी देण्याची आमची मागणी आहे. त्या संदर्भात यापूर्वीच ग्रामविकास खात्याचा आम्ही ठराव दिलेला आहे; परंतु या भरती प्रक्रियेत परजिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच्याविरोधात सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याची आमची तयारी आहे. काही झाले तरी परजिल्ह्यातील उमेदवारांना याठिकाणी थारा देणार नाही. शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बदली केलेल्या शिक्षकांवर अन्याय झाला आहे. पती-पत्नी शिक्षक असताना 30 किलोमीटरच्या आतमध्ये त्यांना नियुक्ती द्यावी, असा शासनाचा आदेश आहे; मात्र शासनाच्या काही अधिकाऱ्यांकडून या आदेशाचा भंग झाला आहे. त्यामुळे अनेकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. 169 शिक्षक, शिक्षकांचा यात समावेश आहे.'' 

ते म्हणाले, ""शासनाचा अद्यापपर्यंत खावटी कर्ज वसुलीसंदर्भात स्पष्ट आदेश आलेला नाही. त्यामुळे कोणालाही वसुलीच्या नावावर त्रास देणार नाही. आज तालुक्‍यातील सोसायटीचे अध्यक्ष सचिव आदींची बैठक झाली. जिल्ह्यातील सोसायटी शंभर टक्के संगणकीकृत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून या सोसायटीला लागणारे संगणक आणि सॉफ्टवेअर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना जिल्हा बॅंकेत न येता सोसायटी स्तरावर कर्ज पुरवठा तसेच अन्य सेवा द्याव्यात, या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. त्यात 226 पैकी 140 सोसायट्या आतापर्यंत संगणीकृत झाल्या आहेत. पुढील काळात उरलेले सोसायटी आधुनिक करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून 15 लाखापर्यंतचे गृह कर्ज सोसायटी स्तरावर देण्यात येणार आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना निश्‍चितच होणार आहे.'' 

यावेळी विकास सावंत, गुरुनाथ पेडणेकर हे जिल्हा बॅंकेचे संचालक उपस्थित होते. 

काजूला मिळणार चांगला दर 
काजूला येणाऱ्या काळात चांगले दर मिळणार आहेत. त्यासाठी आमदार नितेश राणे प्रयत्नात आहेत. त्यामुळे 13 तारखेपर्यंत कोणी काजू विकू नयेत, असे सावंत यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sathish Sawant comment