टीकेची पर्वा करणार नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

कणकवली - शेतकऱ्यांकडून थेट काजू खरेदी करीत असल्याच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील व्यापारी माझ्यावर टीका करीत आहेत. या टीकेची पर्वा नाही. शेतकऱ्यांना हमी भाव देऊनच आपण टीकेला उत्तर दिले आहे, अशा भावना जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे व्यक्त केल्या.

कणकवली - शेतकऱ्यांकडून थेट काजू खरेदी करीत असल्याच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील व्यापारी माझ्यावर टीका करीत आहेत. या टीकेची पर्वा नाही. शेतकऱ्यांना हमी भाव देऊनच आपण टीकेला उत्तर दिले आहे, अशा भावना जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे व्यक्त केल्या.

जिल्हा बॅंक, बाजार समिती आणि काजू कारखानदार यांच्या संयुक्‍तपणे जिल्ह्यात काजू खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ठिकाणी प्रतिकिलो १४० रुपये दराने काजूची खरेदी केली जात आहे. आज कणकवलीतील काजू खरेदी केंद्राला सतीश सावंत यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठीच आम्हाला काजू खरेदी केंद्रे सुरू करावी लागल्याचे स्पष्ट केले. या वेळी महाराष्ट्र काजू उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. झांट्ये, बंडू ठाकूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. सावंत म्हणाले, ‘‘तीन आठवड्यांपूर्वी काजू खरेदीचा दर १६० रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत खाली आला. यामुळे जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला. काजू उत्पादनात यंदा वाढ झाली असली तरी काजू खरेदीचा दर एवढ्या खाली येणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काजू उत्पादनाला हमीभाव देण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजारांमध्ये ठोस हमीभाव देऊन काजू खरेदी सुरू केली; मात्र काजू खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांकडून कमी दर, तर बाजार समितीच्या काजू केंद्रांवर अधिक दर शेतकऱ्यांना मिळू लागला. 

या मुद्द्यावर जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांकडून टीका केली जात आहे. जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीच आहे. त्यामुळे आम्ही जो दर जाहीर केला, तोच दर शेतकऱ्यांना दिला आहे. यात खोटे बोलण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जिल्ह्यात उत्पादित होणारा काजू उच्च गुणवत्तेचा आहे. त्यामुळे इथल्या काजू दराशी तडजोड होता नये, तरच इथल्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.’’

बाजार समितीच्या खरेदी केंद्रावरून खरेदी केलेला काजू जिल्ह्यातीलच काजू कारखानदारांना दिला जात आहे. त्यामुळे इथेच प्रक्रिया होऊन रोजगार निर्मितीची क्षमतादेखील वाढत आहे. काजू खरेदी आणि विक्रीचा संपूर्ण व्यवहार पारदर्शी आहे. यात आमचा कोणताही स्वार्थ नाही. त्यामुळे या मुद्द्यावर होणारी टीका निरर्थक आहे. 
- सतीश सावंत, अध्यक्ष, जिल्हा बॅंक

Web Title: satish sawant