संघर्षाची दाहकता दाखवणारी सावित्रीबाई फुलेंची तीन पत्रे 

savitribai phule birth anniversary
savitribai phule birth anniversary

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित डॉ. मा. गो. माळी संपादित सावित्रीबाई फुले समग्र वाङ्‌मय या पुस्तकामध्ये सावित्रीबाई यांनी ज्योतिबांना लिहिलेली तीन पत्रे उपलब्ध आहेत. ही तिन्ही पत्रे वेगवेगळ्या संघर्षाची वास्तवता व दाहकता समोर मांडतात. 
  
 10 ऑक्‍टोबर 1856 रोजी सावित्रीबाईंनी त्यांचे माहेर नायगाव (जिल्हा सातारा) येथून पहिले पत्र लिहीले. आजारपणाने विश्रांतीसाठी त्या माहेरी आल्या होत्या. आपल्या भावाने केलेली सेवा व त्याची माया सांगताना त्यांना किती पातळीवर संघर्ष करावा लागला हे सुद्धा कथन करतात. 1848 मध्ये स्त्री शिक्षण, 1853 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृह आणि 1855 मध्ये शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी रात्रशाळा सुरू करताना समाजातील कर्मठ लोकांशी संघर्ष करताना भाऊसुद्धा नाराजी व्यक्त करून हे काम थांबवण्याची सूचना करतो. त्याबद्दल त्या लिहितात, मी त्यांच्या मताचे खंडन करून बोलले. भाऊ तुझी बुद्धी कोती असून भट लोकांच्या शिकवणीने दुर्बल झाली आहे. भट लोकांच्या श्रेष्ठत्वास आधारभूत विद्या हीच होय. तिचा महिमा मोठा आहे. जो कोणी तिला प्राप्त करून घेईल त्याची निचता दूर पळून उच्चता त्याचा अंगीकार करील. पत्राच्या अखेरी त्या लिहितात, पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजवणारे विदूषक पुष्कळ आहेत तसेच येथेही आहेत. त्यांना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे? सदासर्वदा कामात गुंतावे. भविष्यातील यश आपलेच आहे. 

दुसरे उपलब्ध एका पानाच्या पत्रामध्ये त्यांनी एक प्रसंग ज्योतिबांना कळविला. त्या लिहितात, येथे एक अघटित वर्तमान घडले की, गणेश नामे एक ब्राह्मण यास पोथीपुराणांचा नाद असून गावोगावी फिरून पंचांग सांगून उदरनिर्वाह करत करत गावी येता झाला. परंतु येथील नुकतीच वयात आलेली सारजा नामे पोरीवर त्याची प्रीती जडली असोन, त्यापासून तीस सहा महिने दिवस गेले आहेत. त्याचा बोभाटा होऊन गावातील दुरमती दुष्ट टवाळांनी त्या उभयतास आणून मारपीट करून गावातील गल्लीबोळातून वाजतगाजत मिरवत ठार मारण्यास चालविले. ही भयंकर गोष्ट मला कळताच मी तेथे धावत पळत गेले व त्या लोकांस इंग्रज सरकारचे भय दाखविले व त्यांना क्रूर कर्मापासून वळविले. ती उभयता मला देवी समजून पाया पडून शोक करू लागली, त्यांचा शोक उणा होईना. त्यांची कशीबशी समजूत घालून या उभयतांना तुमच्याकडे पाठविले आहे. 

या घटनेमध्ये स्वतः पुढाकार घेत त्या तत्कालीन सामाजिक मानसिकतेबरोबर संघर्ष करतात आणि त्याचवेळी ज्योतिबांनी त्यांना निर्णय घेण्याची दिलेली मोकळीक स्पष्ट करतात व एकमेकांप्रती असलेला आदर व विश्वास प्रकट करतात. 

उपलब्ध तिसरे पत्र हे 20 एप्रिल 1877 रोजी जुन्नर येथून लिहिलेले आहे. 1876 पासून तीव्र दुष्काळ व सभोवतालची दयनीय परिस्थिती त्यांनी कळविली आहे. याही परिस्थितीमध्ये सत्यशोधक साथीना घेऊन त्या मदतकार्य करत होत्या. मदतकार्य करणाऱ्यांवर खोटे आळ घेऊन गुन्हे दाखल करून पोलिसांनी पकडून नेल्यावर त्या स्वतः कलेक्‍टरना भेटून सत्य कथन करतात व त्यांची सुटका करून घेतात. धन्य त्या सावित्रीबाई. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com