एकपात्री प्रयोगातून उलगडला सावित्रीमाईंचा जीवनप्रवास

pali
pali

पाली - आपल्या सकस आणि दर्जेदार अभिनयाने व्हयं मी सावित्रीबाई बोलतेय...! हा एकपात्री प्रयोग जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षिका करत आहेत. गेल्या अडिच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून राजिप तळवली प्राथमिक शाळेच्या शिक्षीका सोनल पाटील हे प्रबोधनाचे कार्य करत आहेत.

आपल्या कामाची जबाबदारी सांभाळून ते देखील कोणतेही शुल्क किंवा मानधन न स्विकारता सोनल पाटील हे समाजप्रबोधनाचे व जनजागृतीचे काम करत आहेत. सावित्रीमाईंचे बालपण ते मृत्युपर्यंतचा संपुर्ण संघर्षमय जिवनपट त्या आपल्या एकपात्री प्रयोगातून हुबेहूब चितारत. सावित्रीमाईंच्या हुबेहूबे पेहराव करतात. या प्रयोगात त्या सावित्रीमाई, आई-वडिल, ज्योतीबा, सासरे, विरोध करणारे ब्राम्हण, विद्यार्थी मिळून तब्बल १२ भुमिका प्रभावी संवाद व अभिनयासह करतात. त्या काळातील अनेक संदर्भ व घटना या काळाशी सोनल पाटील जुळवितात. जसे ज्योतीबा व सावित्री माईंनी सुरु केलेली सत्यशोधक लग्नाची पद्धत सध्या कशी लागू पडू शकते हे त्या सांगतात. 

आत्तापर्यंत त्यांनी २८ प्रयोग केले आहेत. गुरुवारी (ता.३) सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त पालीतील समाजकल्याण विभागाच्या मुलीच्या वस्तीगृहात त्यांचा २९ वा प्रयोग होणार आहे.

सोनल पाटील यांनी सकाळला सांगितले की, पुण्यातील सुष्माताई देशपांडे यांच्या कार्यशाळेतून त्यांनी या एकपात्री प्रयोगाचे धडे घेतले. सुष्मा देशपांडे यांनीच या प्रयोगाची स्क्रिप्ट लिहिली आहे त्याचे पुस्तक देखिल आहे. माणगाव तालुक्यातील वडघर येथे असलेल्या साने गुरुजी स्मारकातील सभासदांनी पाटील यांना हे एकपात्री प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सोनल पाटील यांनी पहिला प्रयोग १० मार्च २०१६ ला राजिप तिसे शाळेत सादर केला. दुसरा प्रयोग १२ एप्रिलला इंदापुर येथे आंबेडकर जयंती निमित्त महिला मेळाव्यात अडिचशेहून अधिक महिलांसमोर सादर केला.

संपुर्ण महाराष्ट्रात त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापुर, नगर, रत्नागिरी, चिपळून व रायगड अशा विविध ठिकाणी एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण केले आहे. मोठ्यांसाठी असलेला प्रयोग सव्वा ते दिड तास चालतो. तर विदयार्थ्यांसाठी असलेला प्रयोग पाऊण ते एक तास चालतो. सर्वसामान्यांसह अनेक दिग्गजांनी त्यांच्या या एकपात्री प्रयोगाचे व प्रबोधन कार्याचे कौतूक करतात. विदयार्थी व तरुणांमध्ये त्या खुप लोकप्रिय आहेत. व्हय मी सावित्रीबाई बोलतेय...! या नावाचे त्यांचे वेब पेज देखिल आहे.

सामाजिक बांधिलकी व प्रबोधन यासाठी काम सांभाळून मी हे एकपात्री प्रयोग सादर करते. यासाठी कोणतेही मानधन किंवा शुल्क घेत नाही. या माध्यमातून सावित्रीमाईंचे विचार व आचार विदयार्थी आणि जनमानसांत पोहचविण्याचे माझे ध्येय आहे.
- सोनल पाटील, शिक्षीका, एकपात्री प्रयोग सादरकर्त्या

सोनल पाटील अतिशय अप्रतिम व प्रबोधनात्मक कलाकृती सादर करतात. सुस्पष्ट संवाद, डोळ्यात पाणी आनणारा अभिनय आणि न थांबता न थकता सावित्रीबाईंमध्ये एकरुप होऊन सादरिकरण होते. सावित्रीबाईंना हुबेहूब डोळ्यासमोर सादर करण्याचे कार्य सोनल पाटील यांच्याकडून सदैव सुरु रहावे.
- शाम धांडे, प्रेक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com