सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूकीत आघाडीत बिघाडी, भाजपमध्ये बंडखोरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

पोटनिवडणुकीसाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले होते. दोन अर्ज अवैध ठरले.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात असून, अपक्ष जावेद शेख यांनी माघार घेतली आहे. महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊनही ऍड. दिलीप नार्वेकर यांनी अर्ज मागे न घेतल्याने येथे आघाडीत बिघाडी, तर भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. एकूणच येथे तीन राजकीय पक्षात खरी रंगत पाहायला मिळणार आहे. 

पोटनिवडणुकीसाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले होते. दोन अर्ज अवैध ठरले. उर्वरित सातमध्ये शिवसेनेकडून खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, भाजपकडून सच्चिदानंद ऊर्फ संजू परब, कॉंग्रेसच्या एबी फॉर्मवर ऍड. दिलीप नार्वेकर, तर अपक्ष म्हणून बबन साळगावकर, सौ. अन्नपूर्णा कोरगावकर व जावेद शेख होते. शिवसेना नेते, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेचा उमेदवार निश्‍चित होणार आहे. तशी बोलणीही स्थानिक व राज्यपातळीवरील नेत्यांशी सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. कुडतरकर यांचा प्रचारही सुरू केला होता. एकूणच आजच्या घडामोडीनंतर वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा उमेदवार निश्‍चित करत कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असताना प्रत्यक्ष उमेदवारी मागे घेताना कॉंग्रेसच्या तिकिटावर अर्ज दाखल केलेले नार्वेकर उमेदवारीवर ठाम राहिले. नार्वेकरांची भूमिका लक्षात घेता येथे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आले. 

भाजपमध्येही बंडखोरी

दुसरीकडे भाजपमध्येही बंडखोरी असून, प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. बबन साळगावकरसुद्धा रिंगणात असून, साटेलकर यांनीही माघार घेतली नाही. त्यामुळे तीन अपक्ष व तीन राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. इथली राजकीय परिस्थिती पाहता येथे भाजपने शिवसेनेसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेचे दीपक केसरकर यांना विधानसभा निवडणुकीत पडलेली पाच हजार तीनशे मते पाहता तेच चित्र या निवडणुकीत दिसेल, हे सांगता येत नाही. त्यावेळी शिवसेनेने राजन तेली यांच्या विरोधात बाहेरचा उमेदवार म्हणून केलेला प्रचार व आघाडीचा उमेदवार म्हणून बबन साळगावकर प्रचार मागे पडल्याने केसरकर यांना फायदा झाला होता. आता तशी परिस्थिती नाही. शिवसेनेचे उमेदवार नवखे आहेत. भाजपचे उमेदवार हे राजकीयदृष्ट्या मुरलेले आहेत. दीपक केसरकर यांची शहरावर पकड असली तरी गत पालिका निवडणुकीत संजू परब यांनी आठ नगरसेवक निवडून आणण्याचा करिष्मा केला होता. त्यामुळे राणे समर्थक व भाजप अशी एकत्र ताकद आज त्यांच्या मागे आहे. शिवसेनेचे कुडतरकर विरुद्ध संजू परब अशी सरळ लढत येथे पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा - राणे म्हणाले, उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री 
 

मतांची होणारी विभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर

दुसरीकडे कॉंग्रेसमधून रिंगणात असलेले नार्वेकर कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी नगराध्यक्ष म्हणून कामही पाहिले आहे. जिल्हा बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना पडणारी मते भाजप व शिवसेनेच्या उमेदवाराला विजयासाठी निर्णायक ठरणार आहेत. सौ. कोरगावकर व बबन साळगावकर येथे बऱ्यापैकी मते घेणार असल्याने मतांची होणारी विभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, हे औसुक्‍याचे ठरणार आहे. महाविकास आघाडी होऊनही कॉंग्रेसमधून उमेदवारीवर ठाम राहिलेल्या ऍड. नार्वेकर यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, कसा प्रचार करतात, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे. 

पत्रावरून संभ्रम 

एकीकडे कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असतानाच सोशल मीडियावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून दिलीप नार्वेकर यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याबाबत शुभेच्छापर पत्र फिरत असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खास करून हे पत्र आजच्याच तारखेने असल्याने पक्षाची नेमकी भूमिका काय हा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. 

हेही वाचा - लोटेत रासायनिक कारखाने नकोत; अन्यथा... 

राष्ट्रवादी कुडतरकर यांच्या मागे

""राष्ट्रवादी पक्षाकडून कुठल्याही प्रकारची बिघाडी महाविकास आघाडीमध्ये झालेली नाही. याठिकाणी पक्षाचा आदेश मानून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबू कुडतरकर यांचे काम करणार आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला होता; मात्र असे असतानाही राष्ट्रवादीकडून पुंडलिक दळवी यांनी दाखल केलेली उमेदवारी ही पक्षाचा आदेश मानून त्यांनी जाणून-बुजून अवैध ठरवली.'' 
- अमित सामंत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस 
 

काँग्रेसची माघार
""निवडणुकीतून कॉंग्रेसने माघार घेतली असून, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचे उमेदवार खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचा निरोप ऍड. दिलीप नार्वेकर यांना देण्याची पक्षाने सोपवलेली जबाबदारी मी पार पाडली. त्यांनी पक्षाचा आदेश डावलला. याबाबत पक्ष निर्णय घेईल. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे.'' 
- विकास सावंत, जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sawantwadi Corporation City President Election