सावंतवाडीत रंगली छापानाट्याची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

सावंतवाडी : नवे पोलिस अधीक्षक आल्यानंतर जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात छापासत्र सुरू आहे; मात्र या धामधुमीत बुधवारी (ता. 13) रात्री शहरातील एका दारूअड्डयावरील छापानाट्य शहरात चर्चेचा विषय बनले आहे. राज्य उत्पादन शुल्क, पोलिस यासह तपास यंत्रणा मात्र असा छापा झालाच नसल्याचा दावा करत आहेत.

सावंतवाडी : नवे पोलिस अधीक्षक आल्यानंतर जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात छापासत्र सुरू आहे; मात्र या धामधुमीत बुधवारी (ता. 13) रात्री शहरातील एका दारूअड्डयावरील छापानाट्य शहरात चर्चेचा विषय बनले आहे. राज्य उत्पादन शुल्क, पोलिस यासह तपास यंत्रणा मात्र असा छापा झालाच नसल्याचा दावा करत आहेत.
जिल्ह्यात मल्लिकार्जुन प्रसन्ना, रवींद्र शिसवे यांच्या पोलिस अधीक्षकपदाच्या कारकिर्दीत अवैध धंदे जवळपास बंद झाले होते. नंतरच्या काळात आलेल्या अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत मात्र हे धंदे सुसाट सुरू झाले. मटका, जुगार याच्या जोडीला गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक फोफावली. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकपदाची धुरा अमोघ गावकर यांनी स्वीकारली. त्यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. यामुळे विशेषतः स्थानिक गुन्हा अन्वेषणचे छापासत्र सुरू आहे. अवैध धंदे बंदचा संदेश पोचल्याने मटका, जुगार यांचे बरेचसे अड्डे बंद झाले आहेत; मात्र काही छुप्या पद्धतीने सुरू आहेत.

शहरात गोवा बनावटीच्या दारूविक्रीची सूत्रे हलविणारे रॅकेट अनेक महिन्यांपासून सक्रीय आहे. आलिशान प्रवासी मोटारीला काळ्या काचा लावून ही दारू वाहतूक होते. शहर परिसरात याचा साठा होत असल्याचीही चर्चा आहे. यातीलच शहरातील एका अड्डयावर बुधवारी रात्री तपास यंत्रणांनी छापा टाकल्याची चर्चा गेले दोन दिवस आहे. छापा कोणी टाकला, त्यात काय मिळाले, कितीची सेटलमेंट झाली याविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे. यामुळे छापा पडला की, ती अफवा होती, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

याबाबत तपास यंत्रणा मात्र कानावर हात ठेवत आहे.

जिल्हा अन्वेषण गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना या कारवाईबाबत विचारले असता आपल्या खात्याकडून अशा प्रकारची कोणतीही कारवाई झालेली नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title: Sawantwadi discussion lasted raid Drama