समाजवादी वारसा पुढे नेण्यासाठी साथ द्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

सावंतवाडी ः शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा समाजवादी विचारसरणीची आवश्‍यकता आहे. हा समाजवादी विचारसरणीचा वारसा (कै.) जयानंद मठकर यांच्या घराण्याला लाभला आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रभाग क्रमांक 5 अ मधील सर्व मतदारांनी मला साथ द्यावी, असे आवाहन अपक्ष उमेदवार सीमा मिलिंद मठकर यांनी केले.

सावंतवाडी ः शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा समाजवादी विचारसरणीची आवश्‍यकता आहे. हा समाजवादी विचारसरणीचा वारसा (कै.) जयानंद मठकर यांच्या घराण्याला लाभला आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रभाग क्रमांक 5 अ मधील सर्व मतदारांनी मला साथ द्यावी, असे आवाहन अपक्ष उमेदवार सीमा मिलिंद मठकर यांनी केले.

सौ. मठकर या प्रभाग क्रमांक 5 (स्त्री राखीव) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
त्या पदवीधर आहेत. त्या व्यावसायिक असून त्या महाराष्ट्र शासनाच्या महा-ई-सेवा केंद्र चालवितात कॉलेज जीवनापासून त्या छात्रभारती, राष्ट्रसेवा दल, साने गुरुजी कथाला या सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचे संस्कार झाले आहेत. सौ. मठकर सावंतवाडी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा, मिलाग्रीस हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीवर काम करत असून समता महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी कार्य करत आहेत.

सौ. मठकर म्हणाल्या, ""माझे सासरे तसेच स्वातंत्र्य सैनिक (कै.) जयानंद मठकर हे समाजवादी विचारसरणीचे आमदार होते. त्यांनी शहराच्या विकासासाठी मोठा हातभार लावला आहे. त्यांच्या विचारांमधील शहराच्या विकासाचा वारसा कायम ठेवणार आहे. पालिका ही एक स्वायत्त संस्था आहे. त्याठिकाणी कार्यकर्त्यांच्या कार्याचा कस लागतो. मी सभागृहात मौन भूमिका न स्वीकारता जनतेच्या, नागरिकांच्या प्रश्‍नावर आवाज उठविणार आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार (कै.) मधु दंडवते, (कै.) प्रमिला दंडवते, थोर विचारवंत (कै.) एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मृणालताई गोरे, ग. प्र. प्रधान, माजी नगराध्यक्ष साथी दत्ताराम वाडकर यांच्या कार्याचा माझ्या व्यक्तिगत जीवनावर मोठा प्रभाव आहे. तीच माझी प्रेरणा व तीच माझी शक्ती आहे, असे मी मानते. थोर स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार, ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकार विचारवंत कै. जयानंद मठकर यांची सून म्हणून मी मतदारांसमोर जातांना मला अभिमान वाटतो.''
ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्‍न, उघड्या गटारांचा प्रश्‍न, डासांचा उपद्रव, स्ट्रीट लाईटचा प्रश्‍न, रखडलेले रस्त्यांचा प्रश्‍न अशा विविध समस्यांना प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे, हे व त्याशिवाय अनेक प्रश्‍नांच्या समस्या सोडविण्यासाठी मला क्रिकेट फलंदाज या निशाणीवर बटण दाबून आपली सेवा करण्याची व अपक्ष नगरसेवक म्हणून सावंतवाडी नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन सौ. मठकर यांनी केले.

निवडणुकीला सामोरे जाताना मी कोणत्याही कामाचे आश्‍वासन देणार नाही. परंतु मी माझ्या कामाच्या माध्यमातून, तसेच नगरपालिका कायदा, नगरपालिकेचे नियम, पोटनियम, विधी- उपविधी यांचा मी सर्व प्रथम अभ्यास करून व माझ्या प्रभागामधील नागरिकांच्या ज्या 18 मूलभूत गरजा आहेत, त्या पूर्ण करून देऊन ज्या मतदारांना मला निवडून दिले त्या मतदारांना माझ्या कामाचा अभिमान वाटेल अशी नगरसेविका बनून दाखवेन. हे विचार माझ्या मतदारांपर्यंत पोहचवत असताना मला माझ्या प्रभाग क्रमांक 5 मधील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
- सीमा मठकर, अपक्ष उमेदवार, प्रभाग 5 अ, सावंतवाडी

Web Title: sawantwadi elections