शेतकरी संपाची झळ कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

सावंतवाडी - राज्यात विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाची झळ जिल्ह्यातील भाजी बाजारावर दिसून आली. आज प्रत्येक भाजीत प्रतिकिलो १० ते २० रुपयांची वाढ झाली असून कोथंबिर, मिरची आणि फरसबीसाठी दुपटीने पैसे मोजावे लागत आहे.

सावंतवाडी - राज्यात विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाची झळ जिल्ह्यातील भाजी बाजारावर दिसून आली. आज प्रत्येक भाजीत प्रतिकिलो १० ते २० रुपयांची वाढ झाली असून कोथंबिर, मिरची आणि फरसबीसाठी दुपटीने पैसे मोजावे लागत आहे.

एकूण परिस्थिती पहाता बेळगावहून कमी मालाची आयात करण्यात येत असल्याचे काही भाजी विक्रेत्याकडून सांगण्यात येत आहे. राज्यात शेतकऱ्यांनी आठवड्यापूर्वीच बंद पुकारला होता. विविध मागण्यासाठी भाजी विक्री बंद करून बराचसा शेतमाल रस्त्यावर फेकून निदर्शने केली होती. त्यामुळे बेळगावमधील भाज्यांना मागणी वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य शहरातील बाजारपेठेतील भाजी बाजारात हळूहळू दराचा आलेख वाढत गेला. 

दरम्यान जास्त मागणी असलेल्या भाज्याचे दर आता दुप्पट झाले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाईलाजास्तव पैसे मोजण्याचे धाडस ग्राहकवर्ग करीत आहे. तसे पहाता बाजारपेठेत येणाऱ्या इतर सर्वच भाज्यात किमान १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाळी दिवसातही ग्राहकांसाठी महागाईच्या रुपात आर्थिक मंदी समोर ठाकली आहे. जेवणात भाज्या आवश्‍यक असल्याने बरेच ग्राहक वाढत्या दराच्या किरकोळ भाजीमाल खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. वाढलेल्या दरात ६० रुपये किलो असलेली मिरची १०० ते १२० रुपये, ४० रुपये किलो असलेली फरसबी १२० रुपये, अवघ्या १० रुपयाला मिळणारी कोथंबिरची जुडी ३० ते ४० रुपये, तर ५० रुपये किलोचा गाजर तब्बल १२० रुपये किलो एवढ्या दराने विकला जात आहे. तर बाजारातील जाडी मिरची ६० पासून ८० रुपये किलो, काकडी ३० पासून ४० रुपये किलो, फ्लॉवर २० वरून ४० रुपये किलो, गवार ३० वरुन ४० रुपये किलो, वांगे ४० वरुन ६० रुपये किलो असे आजच्या बाजारपेठेत दर राहिले होते. यात भेंडी, कारले आणि गवार भाज्यांचे दर आज नेहमी प्रमाणे आहेत. 

भाजीची आवक वाढायला हवी
एरवीप्रमाणे बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी नव्हती. तरीही आज वटपौर्णिमेच्या सणानिमित्त किरकोळ स्वरूपात गर्दी होती. भोजनालये, चायनिज सेंटर, हॉटेलवाले असा ठरलेला ग्राहक भाज्यांच्या खरेदीसाठी येत असलेला होता. बाजारपेठेत पुरेसा ग्राहकवर्ग नसल्यामुळे बेळगाव मुख्य ठिकाणाहून सावंतवाडीत कमी प्रमाणात भाजीमाल मागविण्यात येत आहे. पुढील दिवसात बेळगावमधील भाजीमालाची इतरत्र बाजारपेठेत आवक वाढत गेल्यात सध्याच्या दरात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाजही भाजी विक्रेत्याकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: sawantwadi farmer vegetables

टॅग्स