सावंतवाडी : स्थानिक बाजारात हापूस उतरंडीकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hapus mango

सावंतवाडी : स्थानिक बाजारात हापूस उतरंडीकडे

सावंतवाडी: बाजारात सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू आहे. खेडोपाड्यातील महिला आंबा विक्रीसाठी थेट बाजारात आणत आहेत. अशातच हजाराबाहेर पोहोचलेला हापूस आज डझनाला दोनशे ते अडीचशेपर्यंत आला आहे. वातावरणात वाढलेला उष्मा व आवक वाढल्यानेच हा दर स्थानिक बाजारपेठेत उतरंडीकडे गेला आहे.

सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याचे पीक घेतले जाते. दरवर्षी अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक संकटांचा सामना करत आंबा बागायतदार स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर्षीही आंबा बागायतदारांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. यातूनच कसेबसे वाढविलेल्या फळाला सुरुवातीला मोठा दर मिळाला; मात्र आतापर्यंत हजाराच्या बाहेर आंब्याला दर होता. वातावरणात झालेला बदल आणि उष्णतेचे वाढलेले प्रमाण पाहता झाडावरील फळ लवकर तयार झाल्याने मोठ्या प्रमाणात काढणी झाली. परिणामी बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढली आणि हळूहळू हा दर खाली आला. डझनाला पाचशे ते आठशेपर्यंत आठवड्यापूर्वी असलेला दर आज दोनशे-अडीचशेपर्यंत येऊन ठेपला आहे. दुसऱ्या बाजूने विचार करता हापूसबरोबर आज गोवा मानकूरही बाजारात दाखल झाला आहे. हापूसला बरोबरी करताना त्याला चांगला दर मिळत आहे. चांगले मोठे फळ असेल, तर तीनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ग्राहकांकडूनही त्याला मोठी मागणी आहे. तोतापुरी, पायरी आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. त्यामुळे हापूसचा दर खाली घसरला आहे.

सावंतवाडी मार्केटमध्ये येणारा आंबा ग्रामीण भागातून येतो. पहाटे बागायतदार थेट मार्केटमध्ये येऊन विक्रेत्यांना आंबा पुरवतात. त्यावर शंभर-दोनशे रुपये चढवून येथील विक्रेते तो विकतात. काही बागायतदार थेट विक्री करताना दिसून येतात. त्यामुळे हा दर प्रत्येकाकडे वेगळा दिसून येतो. तरीही हापूसचा दर दोनशे ते चांगल्या फळास चारशेपर्यंत आहे. काही दिवसांत हा दर आणखी उतरण्याची शक्यता आहे; मात्र बाजारात कॅनिंग घेणे सुरू झाल्याने बागायदार झाडावरील आंबा न पिकवता तो थेट कॅनिंगला घालतात. त्यामुळे मेहनत व वेळ वाचतो. शिवाय दरही चांगला मिळत असल्याने हा पर्याय निवडल्याचे चित्र सर्वत्र आहे. दुसरीकडे पिकविलेला आंबा कॅनिंगला घातल्यास त्यालाही दर चांगला आहे. एक डझन मोठ्या फळाचे वजन तीन किलोपर्यंत जाते. आज ६० रुपये प्रति किलो दराने पिकविलेले आंबे घेतले जातात. त्यामुळे बाजारात सध्या आंब्याची आवक कमी झाल्यास पुन्हा हापूसला दर मिळणार असल्याचे विक्रेते सांगतात. सध्यातरी सर्वसामान्यांना परवडण्याइतपत हापूसचा दर आल्याने आंबा खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे.

थेट बागायतदारांकडून आम्ही आंबा खरेदी करतो. एकदम जास्त प्रमाणात आंबा उचल केल्याने आम्हाला दरात काहीशी सूट मिळते. तोच आंबा दिवसभर बाजारात बसून आम्ही विक्री करतो. डझनामागे पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त रुपये आम्हाला मिळतात; मात्र तो न खपल्यास नुकसानही सोसावे लागते. आता मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाल्याने दर उतरला आहे.

- विश्वनाथ पायनाईक, आंबा विक्रेता

Web Title: Sawantwadi Hapus Local Market

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SindhudurgKokanmangoSakal
go to top